किनार यशस्वी कष्टाला- प्रतिसाद उदंड लाभला व्यावसायिकतेचा बोलबाला; उद्योगातही साधला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:10 AM2021-03-08T04:10:10+5:302021-03-08T04:10:10+5:30
व्यावसायिकता म्हणजे केवळ व्यवहार नसून उत्कृष्ट दर्जा आणि विश्वास हे समीकरण जपणा-या पुण्यातल्याच सुरेखा ॲडव्हर्टायजिंग या जाहिरात वितरण संस्थेच्या ...
व्यावसायिकता म्हणजे केवळ व्यवहार नसून उत्कृष्ट दर्जा आणि विश्वास हे समीकरण जपणा-या पुण्यातल्याच सुरेखा ॲडव्हर्टायजिंग या जाहिरात वितरण संस्थेच्या प्रोप्रायटर सुरेखा सुधाकर खोचीकर गेली ४५ वर्षे जिद्दीने आपली संस्था चालवित आहेत. वयाच्या ७९ व्या वर्षीही त्यांचा उत्साह थक्क करणारा आहे. ‘सुरेखा ॲड’ या जाहिरात एजन्सीची मुहूर्तमेढ त्यांचे यजमान (पती) पत्रकार सुधाकर खोचीकर यांच्या साहाय्याने केली. त्या काळातील व्यावसायिक गणिते, तंत्रज्ञानाचा अभाव, काम करण्याची पद्धत निराळी होती. त्यातून त्या काळात महिला या क्षेत्रात जास्त कार्यरत नव्हत्या परंतु सर्व आव्हानांना तोंड देत आकर्षक जाहिरात आणि तत्पर सेवा या वैशिष्ट्यांमुळेच महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही त्यांनी जाहिरात वितरीत केल्या व संस्था नावारूपाला आणली.
सध्याच्या कोरोनाच्या काळातही ही सेवा त्यांनी अविरतपणे चालू ठेवली, कामात कार्यमग्न असणे ही आजूबाजूच्या नकारात्मक परिस्थितीवर केलेली मात ज्येष्ठांना आदर्शवत ठरणारी आहे.
नवतंत्रज्ञान आत्मसात करत ग्राहकांच्या बदलत्या अभिरूचीचे भान ठेवून काम केल्यास यश तुमचेच आहे, असे या आत्मविश्वासाने सांगतात. एका स्त्री म्हणून अनेक संकटांचा सामना करावा लागला परंतु कामावरील निष्ठा, परिश्रम आणि ग्राहकांची विश्वासार्हता ही त्रिसूत्री जपली आणि यशस्वी झाले असेही त्या अभिमानाने सांगतात.
पतीच्या पश्चात त्यांच्या ‘ऊसमळा’ या शेतीविषयक मासिकाच्या संपादकपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. शेतक-यांना केलेले तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन हे या अंकाचे वैशिष्ट्य या त्यांच्या कार्याची त्यांना कन्या भाग्यश्री व जावई यांचे मोलाचे साहाय्य मिळते आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!
- भाग्यश्री देशपांडे