खाद्यतेल व्यापार्याची पैशांची बॅग पळवली; ९९ हजारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 05:46 PM2022-01-17T17:46:33+5:302022-01-17T17:46:54+5:30
खाद्य तेल व्यापार्याकडे काम करणार्या टेम्पोचालकाचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी टेम्पोमध्ये ठेवलेली ९९ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लांबविली
पुणे : खाद्य तेल व्यापार्याकडे काम करणार्या टेम्पोचालकाचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी टेम्पोमध्ये ठेवलेली ९९ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लांबविली. याप्रकणी टेम्पोचालक सूर्यकांत ढोणे (वय २२, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी दुपारी खडकी भागात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोणे एका खाद्यतेल व्यापार्याकडे काम करतात. व्यापार्याच्या गोदामातील खाद्यतेलाचे डबे शहरातील किराणा माल विक्रेत्यांकडे पोहचविण्याचे काम ढोणे करतात. रविवारी दुपारी एकच्या सुमाारास खडकीतील संतोष प्रोेव्हिजन स्टोअर्सजवळ ढोणेंनी टेम्पो लावला. ते तेलाचे डबे किराणा माल विक्रेत्याला देण्यात आले. किराणा माल विक्रेत्यांकडून जमा केलेली ९९ हजार २६८ हजारांची रोकड तसेच धनादेश ढोणे यांनी टेम्पोत ठेवले होते. ढोणे याचे लक्ष नसल्याची संंधी साधून चोरट्याने टेम्पोतील बॅगेत ठेवलेली रोकड तसेच धनादेश असा ऐवज लांबविला. काही वेळानंतर ढोणे टेम्पोजवळ आले़ तेव्हा टेम्पोतील बॅगेत ठेवलेली रोकड आणि धनादेश लांबविल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी तपास करत आहेत.