रानभाज्या लोकचळवळ व्हावी : प्र.के घाणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 05:34 PM2018-06-22T17:34:13+5:302018-06-22T17:34:13+5:30

रानभाज्या कधी खाव्यात, कशा कराव्यात ,कशाबरोबर खाव्यात याचे पारंपरिक ज्ञान वनवासी -गिरीवासी लोकांना आहे.

edible wild plants will in movement : p.k.ghanekar | रानभाज्या लोकचळवळ व्हावी : प्र.के घाणेकर

रानभाज्या लोकचळवळ व्हावी : प्र.के घाणेकर

googlenewsNext
ठळक मुद्देतीन लाख वनस्पती जगात आहेत. त्यातील ३० हजार वनस्पती माणूस वापरतोखाद्यवारसा जपायला हवा. या खाद्यवारशाचे दस्ताऐवजीकरण झाले पाहिजे

पुणे : पर्यावरण स्नेही आणि सेंद्रिय असलेल्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात उपटल्या गेल्या तर हे पौष्टिक वाण अस्तंगत होण्याचा धोका आहे. त्यामुळे शास्त्रीय मार्गाने संशोधन करून रानभाज्यांचे चांगले वाण जतन करण्याची लोकचळवळ व्हायला हवी. हे ज्ञान आणि हा खाद्यवारसा जपायला हवा. या खाद्यवारशाचे दस्ताऐवजीकरण झाले पाहिजे, अशी अपेक्षा प्रा . प्र . के . घाणेकर यांनी गुरुवारी सायंकाळी व्यक्त केली .  
'जीविधा 'संस्थेच्या हिरवाई महोत्सवास प्रारंभ करताना पहिल्या दिवशी 'रानभाज्या : रानातून पानात ' या विषयावर ते बोलत होते. हा महोत्सव इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर येथे सुरु झाला. यंदाचे या महोत्सवाचे आठवे वर्ष आहे . 
प्रा . घाणेकर म्हणाले , तीन लाख वनस्पती जगात आहेत. त्यातील ३० हजार वनस्पती माणूस वापरतो. यापैकी ३०० वनस्पती खाद्य म्हणून वापरता येतात . आणि तीसच वनस्पतींची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. हल्ली रानभाज्यांकडे सर्वांचे लक्ष जाऊ लागले आहे. पूर्वी रानभाज्या गाव वस्तीच्या जवळ आढळत असत. आता त्या शोधायला, मिळविण्यासाठी लांब डोंगरात जावे लागते. रानभाज्या या अधिक पर्यावरणस्नेही आहेत , अधिक सेंद्रिय आहेत. त्यामुळे शहरवासियांचे त्याकडे लक्ष गेले आहे. या रानभाज्या शहरात मिळाव्यात यासाठी त्यांचे काही वाण परसबाग, शेतात लावता येतील का हे पहिले पाहिजे . 
एकीकडे आपण लागवड करीत असलेल्या गोष्टींचे पोषण मूल्य कमी होत चालले आहे. दुसरीकडे रानभाज्या खाण्याची उत्सुकता वाढली आहे. रानभाज्या कधी खाव्यात, कशा कराव्यात ,कशाबरोबर खाव्यात याचे पारंपरिक ज्ञान वनवासी -गिरीवासी लोकांना आहे. 
विवेक वेलणकर यांनी प्रास्ताविक केले. राजीव पंडित यांनी महोत्सवाची माहिती दिली. यावेळी डॉ . वृंदा कार्येकर यांनी रानभाज्या व्हाट्स अप ग्रुपची माहिती दिली .

Web Title: edible wild plants will in movement : p.k.ghanekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.