सुशिक्षित तरुणाईही भोंदू बाबांना बळी, धोक्याची सूचक घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:17 AM2018-06-23T01:17:12+5:302018-06-23T01:17:15+5:30

एखाद्या व्यक्तीवर श्रद्धा असण्यात गैर काहीच नाही; मात्र सध्या दिशादर्शक गुरूंपेक्षाही तथाकथित भोंदू बाबांचे समाजात पेव फुटले आहे.

The educated youth, the victim, the danger indicator | सुशिक्षित तरुणाईही भोंदू बाबांना बळी, धोक्याची सूचक घंटा

सुशिक्षित तरुणाईही भोंदू बाबांना बळी, धोक्याची सूचक घंटा

Next

- नम्रता फडणीस / प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : एखाद्या व्यक्तीवर श्रद्धा असण्यात गैर काहीच नाही; मात्र सध्या दिशादर्शक गुरूंपेक्षाही तथाकथित भोंदू बाबांचे समाजात पेव फुटले आहे. त्या व्यक्तीला आयुष्य समर्पित करून महत्त्वाचे निर्णय त्यांच्या म्हणण्यानुसार घेण्यासारखे गंभीर प्रकार समाजात घडत आहेत. शहरी भागातील उच्चशिक्षित तरुण पिढीही अशा भोंदू बाबांना बळी पडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. समाजातील तरुणाईचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले असल्याची ही एक सूचक घंटा आहे. अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडे पुणे जिल्ह्यातून वर्षभरात अशा प्रकारच्या ३५ केस आल्या असून, त्यातील ८० टक्के प्रमाण सुशिक्षितांचे आहे.
मनुष्याने भौतिक सुखाच्या आहारी न जाता परमार्थाच्या वाटेवर चालण्यासाठी गुरू हा मार्गदर्शकाची मोलाची भूमिका बजावतो. मात्र, जेव्हा गुरूलाच आयुष्याचा सर्वेसर्वा मानले जाते, तेव्हा त्याचे विपरीत परिणाम होऊ लागतात. लग्नाच्या बोहल्यावर चढताना मुलीचा फोटो गुरूला दाखविणे, त्याने नाही म्हटले तर तिला लग्न करण्यास नकार देणे, ‘माझ्यात देव अवतरतो’ असे सांगून भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेण्याचे प्रकार समाजात वाढत चालले आहेत. सुशिक्षित भक्तही गुरूचा शब्द अंतिम मानून त्याच्या निर्णयाचा आयुष्यात अवलंब करताना दिसत आहेत.
पूर्वीच्या काळापासून ग्रामीण भागात असे प्रकार घडत आले आहेत. मात्र, आता शहरी भागातील सुशिक्षितांमध्ये भोंदू बाबांच्या आहारी जाण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. आयुष्यातील ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा, स्पर्धेत मागे पडण्यातून येणारे नैराश्य, त्यातून उद्भवणारे मानसिक विकार यातून आध्यात्मिक शांतीसाठी गुरूला आधार मानणाऱ्यांचीच फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आयुष्यातील तणाव मर्यादेपलीकडे गेल्यास सहनशक्तीचा कस लागतो. मानसिक तणावांमुळे आत्मविश्वास कमी होतो, संशयी वृत्ती वाढते, मनात अस्थिरता निर्माण होते. अशा वेळी कोणतीही सामान्य व्यक्ती खंबीर आधाराच्या शोधात असते. तथाकथित गुरूच्या रूपात हा आधार मिळाला, की काहीसा दिलासा मिळतो. मात्र, अशा अगतिकतेचा भोंदू गुरू आणि बाबांकडून गैरफायदा घेतला जातो.
अध्यात्म, आत्मिक शांतीच्या नावाखाली फसवणूक केली जाते. बाबांच्या मार्गदर्शनाखाली वाहवत गेलेल्यांना अनेकदा आर्थिक, मानसिक नुकसान सहन करावे लागते. स्वत:चे नुकसान करून घेण्यापेक्षा वेळीच या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबाचा आधार घ्यावा. गरज भासल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.
>आईच्या निधनानंतर त्याच्या आयुष्यात आईची जागा तथाकथित गुरूने घेतली. गुरूचे वय अवघे ५२ वर्षांचे. त्याने विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी संपादन केलेली असूनही आयुष्यातील सर्व महत्त्वाचे निर्णय तो गुरूंना विचारूनच घ्यायचा. लग्नानंतरही त्याचे गुरूकडे जाणे सुरूच होते. त्यांचा भक्तगण मोठा होता. गुरू त्याच्याकडून स्वत:च्या वैयक्तिक गोष्टींसाठी पैसे मागायचा; तरीही त्याच्या मनात गुरूंबद्दल कधीच शंका आली नाही. एकदा तर गुरूने त्याला त्याचे घर गहाण ठेवण्यास सांगितले. मात्र, हे बायकोला कळाल्यावर तिने गुरूचे मनसुबे उधळून लावले. तरीही, त्याने गुरूकडे जाणे मात्र सोडले नाही.
>राधा-कृष्ण ही त्याची श्रद्धास्थाने. एक बाई त्याला सांगते, की तिच्या अंगात राधा येते आणि ती त्याच्याशी बोलते. तो तिच्याशी संवाद साधू लागतो. तिच्यातील राधेच्या प्रतिमेमध्ये तो इतका अडकत जातो, की मानसिक संतुलनही हरवून बसतो. दोघांचे घर उद्ध्वस्त होण्यापर्यंत मजल जाते.
>त्या दोघांचे एकमेकांवर मनापासून प्रेम असते. त्यांनी अगदी लग्नाच्या आणाभाका घेतलेल्या असतात. मात्र, त्याच्यावर गुरूचा पगडा अधिक असतो. ‘या मुलीशी लग्न करू की नको?’ असे तो गुरूला विचारतो; पण गुरू ‘नको’ असा संकेत देतो आणि तो त्या मुलीशी लग्न करण्यास नकार देतो.
>आपण कोणत्या तरी देवाचा अवतार असल्याचे भासवून भोंदू बाबा सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करतात. आर्थिक परिस्थिती, मानसिक आजार याबाबत चाचपणी करतात. आजारातून, तणावातून बाहेर काढण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केली जाते. अंनिसकडे वर्षभरात पुणे जिल्ह्यातून सुमारे ३५ केस दाखल झाल्या आहेत. या सर्व केसबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये ८० टक्के प्रमाण सुशिक्षितांचे आहे. पूर्वीच्या तुलनेत अशा केसचे प्रमाण आता वाढले आहे. बाबा आपल्याला काही करतील, या भीतीने लोक तक्रार करण्यासाठी पुढे यायलाही घाबरतात. याबाबत समाजात जागृती होणे आवश्यक आहे.
- नंदिनी जाधव,
पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, अंनिस
>समाजाच्या एकूण लोकसंख्येपैकी सरासरी २५-२८ टक्के लोकांमध्ये मानसिक आजार अथवा तत्सम लक्षणे दिसतात. त्यातून नैराश्य, चिडचिडेपणा, संशयी वृत्ती वाढीस लागते. अजूनही मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करून घेणे, हे समाजाच्या दृष्टीने सर्वसामान्य दृष्टिकोनातून पाहिले जात नाही. मानसिक दडपण हाताबाहेर जाऊ लागल्यास नातेवाईक, आप्तेष्ट यांच्याकडून तथाकथित गुरूकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. मानसिक स्थिती कमकुवत झाली असल्याने लोक यामध्ये वाहवत जातात. आत्मविश्वास कमी झाल्याने परावलंबी होतात. अशा परिस्थितीत सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी कुटुंबीयांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे.
- डॉ. स्वप्निल देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ

Web Title: The educated youth, the victim, the danger indicator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.