शिक्षण मंडळ अखेर बरखास्त

By admin | Published: June 15, 2017 04:57 AM2017-06-15T04:57:16+5:302017-06-15T04:57:16+5:30

महापालिका शिक्षण मंडळ अखेर बरखास्त झाले. आयुक्त कुणाल कुमार यांनी सरकारी निर्णयाचा आधार घेऊन तसा आदेशच बुधवारी दुपारी जारी केला. मंडळाचे

Education Board sends out | शिक्षण मंडळ अखेर बरखास्त

शिक्षण मंडळ अखेर बरखास्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिका शिक्षण मंडळ अखेर बरखास्त झाले. आयुक्त कुणाल कुमार यांनी सरकारी निर्णयाचा आधार घेऊन तसा आदेशच बुधवारी दुपारी जारी केला. मंडळाचे सर्व कामकाज आता महापालिकेच्या माध्यमातून पाहिले जाईल. ‘महापालिकेचा शिक्षण विभाग’ असे आता या विभागाचे नामकरण होणार आहे.
शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यापासूनच शिक्षण मंडळाच्या स्वतंत्र अस्तित्वाला ग्रहण लागले होते. राज्यातील ठाणे, पुणे व अन्य काही महापालिका वगळता सर्व महापालिकांमधील शिक्षण मंडळाचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आणून कामकाज महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून पुणे महापालिका शिक्षण मंडळ बरखास्तीची मागणी विविध स्तरांतून करण्यात येत होती. मात्र, प्रशासनाकडून प्रस्ताव लांबणीवर टाकला जात होता. ‘लोकमत’ने मागील आठवड्यातच यावर प्रकाश टाकला होता.
अखेर आयुक्तांनी याबाबतचा निर्णय बुधवारी घेतला. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना व त्यासंबधीचे आदेश लक्षात घेऊन हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानुसार आता शिक्षण मंडळ अस्तित्वात नसेल. मंडळाचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांचे एकत्रीकरण होईल. महापालिकेचा शिक्षण विभाग असे त्याचे नाव असेल. या विभागाचे प्रमुख महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (जनरल) असतील. खातेप्रमुख म्हणून माध्यमिक विभागासाठी शिक्षणाधिकारी व प्राथमिक विभागासाठी प्रशासकीय अधिकारी (शिक्षण) हे काम पाहतील. ही दोन्ही पदे सरकारनियुक्त असतात.
शिक्षण मंडळात सध्या विहित नियमानुसार कार्यरत असलेले अन्य सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सेवा यापुढे महापालिकेत वर्ग करण्यात आली आहे. या सर्व सेवकांकरिता महापालिकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांकरिता वेळोवेळी जारी केलेले सेवाविषयक आदेश, परिपत्रके लागू राहतील. या शिक्षण विभागासाठी खरेदी कराव्या लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्याच्या खरेदीसाठी यापुढे उपायुक्त, मध्यवर्ती भांडार विभाग यांच्याकडे जबाबदारी असेल. त्यासाठीची सर्व माहिती शिक्षण विभागाने भांडारप्रमुखांना द्यायची आहे. शिक्षण मंडळाची बँकेतील खाती बंद करण्याबाबतचा आदेश आयुक्तांनी दिला आहे. दोन्ही विभागांच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ही खाती बंद करून नवी खाती सुरू करावीत. पूर्वीच्या खात्यांतील सर्व शिल्लक रकमा या नव्या खात्यांत जमा कराव्यात. मंडळातील लेखाधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही प्रक्रिया पार पाडावी. त्यानंतर शिक्षण विभागाचा सर्व आर्थिक व्यवहार महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली येईल, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. शिक्षण मंडळाकडे आजतागायत असलेली सर्व स्थावर व जंगम मालमत्ता या आदेशान्वये पालिकेकडे वर्ग करण्यात यावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे सन १९५०पासून अस्तित्वात आलेल्या शिक्षण मंडळाचे स्वतंत्र अस्तित्व आता कायमचे संपुष्टात आले आहे. सुरुवातीला महापालिकेतच समाविष्ट असलेल्या मंडळाचा कारभार नंतर स्वतंत्र करण्यात आला होता.

शिक्षणमंडळाचे ३०० कोटींचे स्वतंत्र अंदाजपत्रक
सध्या महापालिकेच्या २८७ प्राथमिक शाळा आहेत. ३० माध्यमिक शाळा आहेत. दोन्हीकडे मिळून सुमारे १ लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. दहावीनंतर पुढे ११वी व काही ठिकाणी १२वीचे वर्गही चालवले जातात. गेल्या काही वर्षांत शहरात विविध मोठ्या शैक्षणिक संस्थांनी प्राथमिकपासूनचे वर्ग सुरू केल्यामुळे जुन्या खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील पटसंंख्या घटत असताना महापालिकेच्या शाळांमध्ये मात्र विद्यार्थीसंख्या चांगली आहे. सर्व सरकारी योजना या शाळांमधून राबवल्या जातात. महापालिकेचे शिक्षण मंडळाचे स्वतंत्र अंदाजपत्रक असून दर वर्षी सुमारे ३०० कोटी रुपये महापालिका खर्च करते.
शिक्षण विभागासाठी नगरसेवकांची स्वतंत्र समिती स्थापन करणार किंवा कसे, याबाबत आयुक्तांच्या आदेशात काहीच म्हटलेले नाही. मात्र, काही ज्येष्ठ नगरसेवकांनी अशी समिती स्थापन केली जाण्याची शक्यता व्यक्त केली. तीत नगरसेवकांचा समावेश असेल. शिक्षण विभागाचे निर्णय ही समिती घेईल. त्या निर्णयांना स्थायी समिती व सर्वसाधारण सभा यांच्याकडून मान्यता घेऊन नंतर प्रशासनाच्या माध्यमातून त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन पुढील आयुष्यात नाव कमावलेले अनेक जण विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. प्रसिद्ध लेखक अनिल अवचट यांनी त्यांच्या दोन्ही मुली मुक्ता व यशो यांना जाणीवपूर्वक महापालिकेच्या शाळेत शिक्षण दिले व दोघीही आता स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजकार्य करीत आहेत. याशिवाय राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रातीलही अनेकांचे शालेय शिक्षण महापालिकेच्या शाळेत झाले आहे.

Web Title: Education Board sends out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.