शिक्षण उपसंचालकांसह तिघांविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 07:49 PM2018-03-22T19:49:53+5:302018-03-22T19:49:53+5:30
शिक्षकांना मानसिक, आर्थिक त्रास दिल्याप्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालकांसह तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे़.
पुणे: मॉडर्न कॉलेजच्या दोन शिक्षकांचा निलंबनाचा कालावधी उलटून गेल्यावर सुध्दा त्यांना कामावर न घेत न्यायालयाची दिशाभूल करुन शिक्षकांना मानसिक, आर्थिक त्रास दिल्याप्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालकांसह तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे़.
याप्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत, विस्तार अधिकारी सुनील गायकवाड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत़. प्रा़ दिलीप खंडाळे यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रा़. दिलीप खंडाळे आणि प्रा़.लक्ष्मीकांत शेरखाने हे मॉडर्न महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत़. संस्थेने त्यांना निलंबित केले होते़. निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी संस्थेला आपल्या निलंबनाचा कालावधी संपला असून आम्हाला हजर करुन घ्या, अशी विनंती केली़.त्यानंतरही त्यांना हजर करुन न घेता पगारही दिला नाही़. त्यानंतर संस्थेने या दोघांना १९ आॅगस्ट २०१६ रोजी बडतर्फ केले़. या घटनेनंतर त्यांनी शाळा न्यायाधिकरण यांच्या न्यायालयात अपिल केले़. विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर व अन्य दोघांनी न्यायालयात वेतनवाढ रोखलेली नसताना खोटी व खोडसाळ माहिती देऊन न्यायाधिकरणाची दिशाभूल केली़ . त्याआधारे उच्च न्यायालयाने संस्थेच्या बाजूने निकाल दिला़. तेव्हापासून आम्हाला पगार मिळालेला नाही़ . जातीय द्वेषातून आम्हाला वागणूक देत असून आमचे नुकसान व्हावे, या हेतूने या अधिकाऱ्यांनी न्यायालयात खोटी लेखी माहिती दाखल केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़. सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड अधिक तपास करीत आहेत़ .