खोटी माहिती आढळल्यास शिक्षण विभाग करणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:44 IST2025-01-09T18:44:19+5:302025-01-09T18:44:30+5:30
पुण्यात शिक्षण हक्क कायद्यान्वये (आरटीई)अंतर्गत शाळेत प्रवेश घेताना ठरलेल्या निकषासाठी पालकांकडून खोटी माहिती देण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.

खोटी माहिती आढळल्यास शिक्षण विभाग करणार कारवाई
पुणे : आरटीईअंतर्गत प्रवेशामध्ये अनेक पालक एजंटच्या भूलथापांना बळी पडतात. खास करून मुळशी तालुक्यात असे अनेक प्रकार घडत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. खोटी माहिती आढळली तर शिक्षण विभागाकडून कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.
पुण्यात शिक्षण हक्क कायद्यान्वये (आरटीई)अंतर्गत शाळेत प्रवेश घेताना ठरलेल्या निकषासाठी पालकांकडून खोटी माहिती देण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शाळेचा जवळचा निकषामध्ये बसण्यासाठी चुकीचे भाडेकरार दिले जातात. त्याचबरोबर उत्पन्नाच्या अटीमध्ये बसण्यासाठी चुकीचा उत्पन्नाचा दाखला कागदपत्रांसह दिला जातो. यासाठी काही एजंटच तयार झाले आहेत. अशाप्रकारे चुकीच्या गोष्टी करून खऱ्या गरजू आरटीईअंतर्गत प्रवेश मिळण्यापासून वंचित राहतात. गतवर्षी अशा प्रकारे चुकीची माहिती देऊन प्रवेश घेतलेल्या वीस विद्यार्थ्यांचे प्रवेश शिक्षण विभागाकडून रद्द करण्यात आले आहेत.
त्यामध्ये एकट्या मुळशी तालुक्यातील अठरा जणांचा तर बारामती तालुक्यातील दोघांचा समावेश होता. याबाबत बोलताना जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे म्हणाले, ‘‘आरटीई प्रवेश प्रक्रिया ही पूर्णत: पारदर्शक आणि ऑनलाइन असल्याने पालकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये. तसेच चुकीचे भाडेकरार करून देणे, चुकीचा उत्पन्न दाखला, चुकीची कागदपत्रे देणे अशा प्रकारे शासनाची फसवणूक केली तर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे पालकांनी आपली फसवणूक होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी. तालुका स्तरावर पालकांचे मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात येणार आहेत.