शिक्षणाचा खेळखंडोबा! पुणे जिल्ह्यातील विदयार्थी पुस्तकांपासून वंचित; शिक्षक शाळेत अन् पुस्तके कार्यालयातच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 03:25 PM2021-08-10T15:25:56+5:302021-08-10T15:26:14+5:30
पुस्तकवाटपाचे धोरणच शासनाने निश्चित न केल्यामुळे पुस्तकांचे संच तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी कार्यालयात पडून आहेत.
निनाद देशमुख
पुणे : सुरुवातीला बालभारतीने पाठ्यपुस्तक छपाईला विलंब केल्याने पुस्तके वितरणात समस्या आली होती. मात्र, ही समस्या दूर होऊन दोन महिने उलटले. एकूण मागणीच्या ७० टक्के पुस्तके शिक्षण विभागाला मिळाली. काही संच तालुक्यांपर्यंत पोहोचले. मात्र, हे संच विद्यार्थ्यांना महिना उलटूनही न मिळाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थी हे पुस्तकांपासून वंचित राहिले आहेत. पुस्तकवाटपाचे धोरणच शासनाने निश्चित न केल्यामुळे पुस्तकांचे संच तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी कार्यालयात पडून आहेत.
कोरोनामुळे जिल्ह्यातील काही शाळा या ऑनलाईन तर काही शाळा या ऑफलाईन सुरू आहेत. त्यातही अनेक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहेत. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणे अपेक्षित होते. मात्र, सुरुवातीला बालभारतीकडून पुस्तक छपाईला विलंब झाला. याबाबत ओरड झाल्यानंतर तातडीने पुस्तक छापण्यात आली. असे असले तरी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे पुस्तकाविनाच ऑनलाइन वर्ग सुरू झाले. बालभारतीतर्फे पुस्तके छापल्यावर ती शिक्षण विभागाला देण्यात आली. जवळपास ७० टक्के पुस्तकांची पूर्तता करण्यात आली. संबंधित ठेकेदाराकडून ही पुस्तके जवळपास १० तालुक्यांत पोहोचवण्यात आली.
जिल्ह्यातील पहिली ते आठवी वर्गातील पटसंख्येनुसार बालभारतीकडे ४ लाख २८ हजार ४४७ पुस्तकसंच म्हणजे २४ लाख ५९ हजार ९६९ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. दुर्गम भागातील आदिवासी भागात प्राधान्याने या पुस्तकांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. ही पुस्तके आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या हातात मिळणे अपेक्षित होते. मात्र, ऑगस्टचा पहिला आठवडा उलटूनही ७० टक्केच पुस्तके गटशिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत पोचली आहेत. ही पुस्तके विद्यार्थ्यांना अद्याप वाटण्यात आलेली नाही.
कोरोना काळात पुस्तके कसे वाटप करण्याचे धोरण निश्चित नाही
जिल्हा परिषदेतर्फे बालभारतीकडे मराठीच्या ४ लाख ८ हजार ५३४ पुस्तक संचाची मागणी केली. हिंदी २ हजार ९०९, इंग्रजी १२ हजार ६८, उर्दू ४ हजार ८०८, तमीळ १२८, तर उर्वरित मराठी माध्यमांच्या संचाची मागणी करण्यात आली होती. कोरोना काळात पुस्तके कसे वाटप करण्याचे धोरण निश्चित न झाल्याने पुस्तकांचे वापट करायचे कसे असा पेच शिक्षण विभागापुढे निर्माण झाला आहे.
''तालुक्याच्या ठिकाणी पुस्तके वितरीत करण्यात आली आहेत. मात्र, पुढील काही दिवसांत पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. त्यामुळे शिक्षक परीक्षेच्या तयारीत आहेत. त्यामुळे पुस्तक वाटपाला विलंब होत आहे. पुढील आठवड्यात विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केले जाईल'' असे शिक्षण अधिकारी स्मिता गौड यांनी सांगितले.