शिक्षणाच्या प्रकाशाने ‘दिशा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 01:08 AM2018-10-18T01:08:33+5:302018-10-18T01:08:39+5:30
पुणे : दिव्यांग हा शब्द जे सर्वसामान्य नाहीत, अशा विशेष व्यक्तींसाठी वापरण्यात येतो. खरंतर जे दिव्यांग आहेत त्यांच्याकडे आपल्या ...
पुणे : दिव्यांग हा शब्द जे सर्वसामान्य नाहीत, अशा विशेष व्यक्तींसाठी वापरण्यात येतो. खरंतर जे दिव्यांग आहेत त्यांच्याकडे आपल्या साधारण माणसांपेक्षा वेगळी कला, शक्ती, ऊर्जा असल्याचे दिसून येते. त्याचा प्रत्यय ‘अपूर्व मेघदूत’ हे नाटक पाहिल्यानंतर येतोच; पण त्यातील कलाकारांविषयी जाणून घेतल्यानंतर त्याची अधिक जाणीव निर्माण होते. कारण अंधत्वावर मात करून शिक्षणाचे धडे गिरवत या दिव्यांगांनी स्वत:च्या पायांवर उभे राहण्याचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. अनेक दिव्यांग चांगली नोकरी करीत असून, त्यांनी अंधत्वाची सीमा ओलांडून प्रकाशमय जीवन जगण्याचा ध्यास घेतला आहे.
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून, त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी या अंध तरुण-तरुणींनी बुद्धीच्या, मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारल्या आहेत. अंधारलेल्या जगाला त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून कवडसा पाडण्याचे काम केले आहे. तेजस्विनी भालेकर, विद्यार्थी विकी शेट्टी, संतोष कसबे, गौरव घायले, विद्यार्थिनी रूपाली यादव, प्रवीण पालके (आंध्रा बँकेत अधिकारी) यांनी हे कर्तृत्व सिद्ध केले आहे. यातील काही जण शिक्षण घेत असून, काही नोकरी करीत आहेत. त्याचबरोबर महाकवी कालिदास यांच्या ‘अपूर्व मेघदूत’वर आधारित नाटकात काम करीत आहेत. या मुलांना सोबत घेऊन नाटक करण्याची कल्पना स्वागत थोरात यांची आहे. त्यांनी या मुलांना एकत्र केले आहे.