शिक्षण संस्थांनी प्राध्यापकांवर स्वायत्तता लादू नये
By admin | Published: March 22, 2017 02:57 AM2017-03-22T02:57:20+5:302017-03-22T02:57:20+5:30
स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांना समाजाच्या विकासासाठी अनेक गोष्टी करता येऊ शकतात. परंतु, शिक्षण संस्थांनी आपल्या प्राध्यापकांवर स्वायत्तता लादू नये.
स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांना समाजाच्या विकासासाठी अनेक गोष्टी करता येऊ शकतात. परंतु, शिक्षण संस्थांनी आपल्या प्राध्यापकांवर स्वायत्तता लादू नये. तसेच शासनाने महाविद्यालयांवर अधिक विश्वास ठेवून प्राध्यापकांची पदभरती करण्यासाठी परवानगी द्यावी. संस्थांनी केलेली भरती शासनाने नंतर तपासून पहावी, त्यामुळे महाविद्यालयांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळेल, असे मत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे व परिषदेचे अध्यक्ष डॉ.शरद कुंटे यांनी लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
कुंटे म्हणाले, जगभरातील विद्यापीठांमध्ये विद्यापीठीय शिक्षण आणि उद्योग यांचा एकमेकांशी संमन्वय असल्याचे दिसून येते. मात्र, असे वातावरण भारतात फारसे दिसून येत नाही. विद्यापीठांचा आकार लहान असला आणि उद्योगांनी सहकार्य ठेवले तर संशोधन क्षमतेमध्ये नक्कीच वाढ झालेली दिसून येईल.
शिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना उत्तेजन आणि काम न करणाऱ्यांना शिक्षा दिली तरच शिक्षण संस्थांमध्ये गुणात्मक बदल होऊ शकतात. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आलेली निष्क्रियता झटकणे हा महाविद्यालयांच्या विकासाचा एकमेव मार्ग आहे. सध्या विना अनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांवरच अनुदानित महाविद्यालये सुरू आहेत. आधुनिक काळातील बदलनानुसार शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे वर्षातून एकदा प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे, असे नमूद करून कुंटे म्हणाले, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊ नये. तर पुस्तकाबाहेरील आणि जीवनात उपयुक्त पडणारे ज्ञान दिले पाहिजे. ग्रंथालयातील पुस्तकांबरोबच आधुनिक तंत्राचा ज्ञान वापर प्राध्यापकांनी केला पाहिजे. स्वायत्त महाविद्यालयांचा समाजासाठी उपयोग कसा करून घेता येईल याची दृष्टी संबंधित संस्थेच्या व्यवस्थापनाकडे असल्यास अनेक चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात. मात्र, त्यामुळे पूर्वीच्या यंत्रणेवर ताण पडणार आहे. याची खात्री बाळगली पाहिजे. प्राध्यापकांना विश्वासात घेवून स्वायत्ततेचा निर्णय घेणे अपेक्षित आहे.
समाजाची गरज भागविण्यासाठी शिक्षण संस्थांनी आवश्यक बदल केले पाहिजेत. या मानसिकतेतून प्राध्यापकांनी काम करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून कुंटे म्हणाले, फर्ग्युसन महाविद्यालयातील प्राध्यापकांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर त्यांना शक्य असलेल्या गोष्टींवर काम करण्यास सांगण्यता आले. स्वायत्तता घेतल्यामुळे महाविद्यालयाच्या संशोधनात वाढ होणार आहे.
राज्य शासन व केंद्र शासनाच्या मदतीने महाविद्यालयात अधिक चांगल्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. शिक्षण क्षेत्रात कोणतेही बदल त्वरीत होत नाहीत. तुमची दिशा निश्चित असेल तर शिक्षण क्षेत्रातही योग्य बदल घडू शकतात. फर्ग्युुसनपाठोपाठ आता बीएमसीसीलाही लवकरच स्वायत्तता मिळेल. त्यादृष्टीने संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. समाजाला पुढे घेवून जाण्यासाठी रोजगाराभिमुख, संशोधनाला चालना देणारे आणि नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम राबविल्याशिवाय विद्यार्थी महाविद्यालयात येणार नाहीत, असेही कुंटे म्हणाले.
महाविद्यालयांमधील उपकरणे एकत्र आणून फर्ग्युसन महाविद्यालयांमध्ये उत्तम संशोधन केंद्र सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहेत, असे नमूद करून कुंटे म्हणाले, महाविद्यालयांनी आपल्यातील कमतरता ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संशोधनाला गती देण्यासाठी महाविद्यालयात ‘रिसर्च कल्चर’ तयार होणे आवश्यक आहे.
प्राध्यापकांच्या तुटवड्यामुळे महाविद्यालये चालवणे कठिण जात आहे. त्यामुळे शासनाने प्राध्यापकांच्या भरतीबाबत महाविद्यालयांवर विश्वास टाकण्याची गरजेचे आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)