शिक्षण मंत्री हाय हाय...फी वाढीविरोधात पुण्यात पालकांचे आंदोलन व जोरदार घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 09:01 PM2021-01-27T21:01:52+5:302021-01-27T21:02:53+5:30
गेल्या काही महिन्यांपासून पालक व संस्था चालकांमध्ये शालेय शुल्कावरून वाद सुरू
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे केवळ ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यामुळे शाळांच्या शुल्कात कपात करावी,अशी मागणी पालकांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे बालभारती येथे बुधवारी केली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने पालकांनी शिक्षण मंत्री हाय...हाय च्या घोषणा दिल्या. तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधातील घोषणा दिल्या.
गेल्या काही महिन्यांपासून पालक व संस्थाचालकांमध्ये शालेय शुल्कावरून वाद सुरू आहे.तसेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रसिध्द केलेले परिपत्रक संदिग्ध असून पालकांना त्यामुळे दिलासा मिळाला नाही.अनेक शाळा पूर्ण शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावत आहेत.त्यामुळे पॅरेंट्स असोसिएशन पुणे’च्या प्रतिनिधींनी वर्षा गायकवाड यांची भेट घेवून निवेदन दिले. तसेच देशातील इतर राज्यांनी केलेल्या शुल्ककपातीचा माहिती दिली. परंतु,शुल्काबाबत शासन व काही शिक्षण संस्थांच्या याचिकेव्र सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसेच पालकांच्या तक्रारी या सीबीएसई आणि इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळांबाबत तक्रारी आहेत. त्यावर राज्य शासन कारवाई करू शकत नाहीत,असे सांगितले. त्याचप्रमाणे शुल्कासंदर्भात इतर बोर्डाच्या अधिका-यांबरोबर बैठक लावण्याची पालकांनी केलेली मागणी अमान्य करण्यात आली.त्यामुळे पालकांनी गायकवाड यांच्या निषेध करत घोषणाबाजी केली.
पॅरेंट्स असोसिएशन पुणेच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे म्हणाल्या,राज्य शासनाकडून सर्व बोर्डाच्या शाळांना परवानगी दिल्या जात असल्याने या शाळांवर शासनाचे नियंत्रण असले पाहिजे. संस्थाचालक न्यायालयात पाच पाच वकील लावत असले तर शासनाने सुध्दा जास्त वकील लावून पालकांची बाज मांडली पाहिजे. देशातील सुमारे 15 ते 16 राज्यांनी शुल्क कमी केले आहे. इतर राज्यात शुल्क कमी होत असेल अतर महाराष्ट्रातही कमी झाले पाहिजे.
ऑनलाइन शाळा सुरू असल्याने पालकांनी पूर्ण शुल्क न भरण्याची भूमिका घेतली आहे.मात्र,पूर्ण शुल्क दिले नाही तर पुढच्या वर्षी शाळेत प्रवेश दिला जाणार नाही अशी धमकी काही संस्थांनी दिली आहे.त्यामुळे शुल्क कपात करावी,अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
----
शिक्षणमंत्री मागच्या दाराने बाहेर
बालभारतीच्या मुख्य दारात वर्षा गायकवाड यांची वाट पहात पालकांनी निदर्शने केली.त्यामुळे गायकवाड यांनी मागच्या दारातून बाहेर पडून दुसऱ्या गाडीतून निघून गेल्या. त्यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांनी पालकाशी संवाद सधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात वाद झाला.त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद संपला.
----