"इंजिनिअरिंग, मेडिकलचे शिक्षण मातृभाषेतून मिळणार..." अर्थमंत्री सीतारामन यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: May 4, 2024 06:46 PM2024-05-04T18:46:57+5:302024-05-04T18:52:01+5:30
नवीन शिक्षण धाेरणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या साेयीनुसार हव्या त्या शाखेत शिक्षण घेता येईल, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले...
पुणे : मातृभाषेतून उच्च शिक्षण घेता आल्यास विद्यार्थ्यांना त्या संकल्पना अधिक चांगल्याप्रकारे समजण्यास मदत हाेते. त्यामुळे आता इंजिनिअरिंग, मेडिकलचे शिक्षणदेखील त्यांना मातृभाषेतून मिळणार आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा हाेईल, असे स्पष्ट करत नवीन शिक्षण धाेरणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या साेयीनुसार हव्या त्या शाखेत शिक्षण घेता येईल, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले.
येरवडा येथील डेक्कन काॅलेजच्या पुरातत्त्व विभागाच्या सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ‘विकसित भारत संकल्पनेमधील शिक्षण आणि शिक्षकांचे योगदान’ यावर त्यांनी विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले. व्याख्यानानंतर त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
सीतारामन पुढे म्हणाल्या की, नवीन शिक्षण धाेरण हे विद्यार्थ्यांसाठी बहुआयामी दृष्टीने उपयुक्त आहे. तुम्हाला हव्या त्या शाखेतील हवे ते शिक्षण घेता येईल. गेल्या दहा वर्षांत प्राेफेशनल मानव्यशाखेच्या शिक्षणाच्या संस्थांमध्ये माेठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. तसेच आयआयटी, ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट, विद्यापीठे आणि काॅलेज यांच्यामध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सीट्सची संख्याही वाढवली आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रात चांगले डाॅक्टर, नर्सेस यांच्या सीट्स वाढवल्या आहेत. तसेच त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी पुरेशा फॅकल्टीचीदेखील तजवीज केली आहे. आधीच्या सरकारने शिक्षणाबाबत काही ठाेस पावले उचलली नाहीत, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.
चायनातील शिक्षण घेऊन येणाऱ्यांना द्यावी लागते परीक्षा....
बाहेरील देशांतून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीतारामन यांनी खडे बाेल सुनावले. त्या म्हणाल्या की, तेलंगणा व इतर राज्यांतून काही विद्यार्थी डाॅक्टर हाेण्यासाठी चीन, बिजिंग येथे जातात व तेथे भारतीय वैद्यकीय शिक्षण संस्थांच्या समकक्ष मान्यता नसणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात. मला माहीत आहे. हैदराबाद येथील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तेथून शिक्षण घेऊन आल्यावर त्यांना कळते की त्यांची डिग्री गुणवत्तापूर्ण संस्थेची नसून त्यावेळी त्यांना भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी येथील परीक्षा द्यावी लागते. याचबराेबर बरेच विद्यार्थी उझबेकिस्तान, युक्रेन येथेही जातात. परंतु त्यांनाही ताेच नियम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राेहित वेमुला प्रकरणाला वेगळे वळण
प्रश्नाेत्तराच्या वेळी एका विद्यार्थ्याने विद्यापीठामध्ये राेहित वेमुलासारख्या प्रकरणाची पुनरावृत्ती राेखण्यासाठी आपले सरकार काय उपाययाेजना करत आहे, असा प्रश्न विचारला असता सीतारामन त्या प्रश्नावरून भडकल्या. उत्तर देताना त्या म्हणाल्या की, राेहित वेमुला या प्रकरणात काही घटकांनी मुद्दामहून विद्यापीठ दलित विराेधी असल्याचे भासवले आहे, ते तसे नाही.