ग्रामीण मुलींना शिक्षण हेच क्रांतिकारक पाऊल - बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 12:40 AM2018-12-28T00:40:25+5:302018-12-28T00:40:42+5:30
ग्रामीण भागातील मुलींना मिळणारे शिक्षण हेच क्रांतिकारक पाऊल आहे. हे शिक्षण विभागाचे कौतुक आहे. या भागात बारावीचे विज्ञान शिक्षण प्राधान्याने सुरू करावे, असे आवाहन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
इंदापूर : ग्रामीण भागातील मुलींना मिळणारे शिक्षण हेच क्रांतिकारक पाऊल आहे. हे शिक्षण विभागाचे कौतुक आहे. या भागात बारावीचे विज्ञान शिक्षण प्राधान्याने सुरू करावे, असे आवाहन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथे नानासाहेब केरबा व्यवहारे विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी कर्मयोगी कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, कारखान्याचे संचालक अतुल व्यवहारे, युवराज व्यवहारे, पंचायत समिती सदस्या पुष्पाताई रेडके यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
थोरात म्हणाले, ‘‘आपल्या मुलांमध्ये करिअर बनवण्याची ताकद आहे. मुलांना विज्ञान शिक्षणाकडे वळविण्याचा प्रयत्न करा. त्यांना उभे करण्यासाठी मदत करा.’’ तसेच, माळवाडी येथील व्यवहारे कुटुंबाने ही शाळा बांधण्यासाठी तीन एकर बागायत जागा दिली आहे. व्यवहारे कुटंबाने विद्यार्थ्यांसाठी आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री थोरात यांनी शाळेसाठी जागा देणाऱ्या व्यवहारे कुटुंबाचे कौतुक केले.
या वेळी राज्याचे माजी सहकारमंत्री पाटील म्हणाले, की राजकारणातील जुन्या नेतृत्वाने इंदापूर तालुक्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ १९८०च्या पूर्वीच रोवली आहे. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेत ३४ हजार विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्यामुळेच तालुक्यात शिक्षणगंगा आली. या वेळी सभापती करणसिंह घोलप, उपसभापती देवराज जाधव, युवा नेते महेंद्र रेडके, सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव, राजेंद्र पवार, सतीश व्यवहारे, बळी बोंगाणे आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी अर्बन बँकेचे अध्यक्ष भरत शहा, नीरा-भीमाचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, दूधगंगाचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील, इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव, स्थापत्य अभियंता राकेश फडतरे आदी उपस्थित होते. मुकुंद शहा यांनी प्रास्ताविक केले. रघुनाथ पन्हाळकर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक विकास फलफले यांनी आभार मानले.
...उलटसुलट चर्चेकडे लक्ष देऊ नका
इंदापूरकरांनी तालुक्याचेच नाही, तर संपूर्ण राज्याचे एक चांगले नेतृत्व २०१४मध्ये मागे ठेवले. मात्र, सध्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात बºयाच उलटसुलट चर्चा चालू आहेत. जे टीका करतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. इंदापूरकरांनी आगामी २०१९मध्ये टीका करणाºयांना त्यांची जागा दाखवून द्या, असा टोला राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या वेळी लगावला.