शिक्षणातून ‘भारतीय’ घडावेत : डॉ. प्रभा अत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:11 AM2021-02-14T04:11:29+5:302021-02-14T04:11:29+5:30
पुणे : आजच्या बदलत्या जगाच्या संदर्भात शिक्षण या शब्दाच्या व्याप्तीचा नव्याने विचार करणे आवश्यक आहे. जीवनातील व्यक्तीविकास ...
पुणे : आजच्या बदलत्या जगाच्या संदर्भात शिक्षण या शब्दाच्या व्याप्तीचा नव्याने विचार करणे आवश्यक आहे. जीवनातील व्यक्तीविकास या शिक्षणातून कसा साधला जाईल, हे पाहणे गरजेचे बनले आहे. आजच्या शिक्षणातून जगाला मानवतेचा संदेश देणारे ‘भारतीय’ घडले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी केले.
रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित अत्रे पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी वंदे मातरम संघटना आणि डॉ. सतीश चव्हाण यांना ‘गुरुवर्य आबासाहेब अत्रे पुरस्कार’, तर सहायक पोलीस निरीक्षक प्रीती शिंत्रे व सामाजिक कार्यकर्ते शिरीष दाते यांना ‘इंदिरा अत्रे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्याध्यक्ष संजीव महाजन उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. प्रभा अत्रे होत्या.
डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, एक सुसंस्कृत व्यक्ती घडवण्यासाठी शाळा कॉलेजचे शिक्षण कमी पडते असे वाटते. केवळ लिहिता वाचता येणं आणि नोकरी मिळवता येणं यापुरती शिक्षणव्यवस्था सीमित झालेली आहे. समृद्ध, संवेदनशील समाजाचा घटक बनवणं, देशाबद्दल, संस्कृतीबद्दल आदर, प्रेम, अभिमान अशा भावना जागृत करणं, देशाच्या उन्नतीसाठी प्राण पणाला लावून योगदान देणारा नागरिक तयार करणं आणि साऱ्या विश्वासाठी मानवता धर्म पाळणारा भारतीय घडवणं हा आमच्या शिक्षणाचा पाया असायला हवा.
या प्रसंगी पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. वंदे मातरम या संघटनेने त्यांना मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेत भर घालून संस्थेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या एखाद्या गरजू, हुशार विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी ही मदत देत असल्याचे जाहीर केले.
डॉ. सतीश चव्हाण, शिरीष दाते, अनिश पाडेकर, प्रेमा पाटील, अभिनेते आनंद इंगळे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. पराग पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.
-----------------------------------------------------------------------------