पिंपरी दुमाला गावात अवतरली शिक्षणाची गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:10+5:302021-07-05T04:08:10+5:30
कोरोना महामारीमुळे गेली दीड वर्षांपासून शाळा पूर्णपणे बंद आहेत. सध्या ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. परंतु यासाठी विद्यार्थी व पालकांना ...
कोरोना महामारीमुळे गेली दीड वर्षांपासून शाळा पूर्णपणे बंद आहेत. सध्या ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. परंतु यासाठी विद्यार्थी व पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून चारचाकी गाडीमध्ये व्हाईट मार्कर बोर्ड, वाचनालयातील पुस्तके, स्वाध्याय कार्ड असे शैक्षणिक साहित्य व गाणी कविता, पाढे, गोष्टी ऐकण्यासाठी साऊंड सिस्टिम घेऊन पिंपरी दुमाला गावातील वेगवेगळ्या वस्त्यांवरील मुलांपर्यंत ही शिक्षणाची गाडी पोहोचते.
शासकीय नियमांचे पालन करून पालक भेटी घेणे, अभ्यास तपासणे ,गाणे, कविता, गोष्टी, पाढे पाठांतर करून घेणे, स्वाध्याय कार्डांचे वाटप करणे इत्यादी कामे मुख्याध्यापक चातुर व शिंदे हे शिक्षक करतात.
परिसरामध्ये आलेल्या शिक्षणाच्या गाडीमधील गाणी गोष्टी ऐकून मुले आनंदाने शिकू लागली आहेत. गावामध्ये मोबाईल रेंजची समस्या आहे त्यामुळे पालकही हतबल झाले होते परंतु या अनोख्या उपक्रमामुळे ते मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत निश्चिंत होऊ लागले आहेत. महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या ४५ दिवसांच्या सेतू-अभ्यास (ब्रिज कोर्स) या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी या उपक्रमाद्वारे करणे सहज शक्य आहे, असे मत मुख्याध्यापक राहुल चातुर यांनी व्यक्त केले.
शाळा बंद असल्यामुळे माझी दोन्ही मुले मोबाईलवर अभ्यास करायची परंतु त्यामध्ये अनेक अडचणी येत असत. शिक्षणाची गाडी या उपक्रमामुळे मुलांना पुन्हा एकदा अभ्यासाची गोडी निर्माण झाली आहे. मुले आनंदाने अभ्यास करु लागली असल्याचे शाळा समितीचे उपाध्यक्षा कल्पना खळदकर यांनी सांगितले.
एज्युकेशन ऑन व्हील्सचा उपक्रमात सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक