शिक्षण झेडपी शाळेत... डंका शासकीय सेवेत!
By admin | Published: April 28, 2017 05:50 AM2017-04-28T05:50:36+5:302017-04-28T05:50:36+5:30
शालेय शिक्षण जरी जिल्हा परिषदेच्या शाळेत व मातृभाषेतून झालेले असले तरीही पुढे जाऊन अनेक विद्यार्थी शासकीय
बारामती : शालेय शिक्षण जरी जिल्हा परिषदेच्या शाळेत व मातृभाषेतून झालेले असले तरीही पुढे जाऊन अनेक विद्यार्थी शासकीय स्पर्धा परीक्षांत दमदार कामगिरी करीत असल्याचे समोर आले आहे. शासकीय सेवेतही त्यांच्या कामगिरीचा डंका वाजू लागला आहे.
गेल्या काही वर्षांत बारामती, इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या प्रिया ढाकणे, अॅड. स्वाती जाधव, डॉ. सागर जाधव यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, आयएफएस आदी महत्त्वाच्या पदांवर झेप घेतली आहे.
अहमदनगर ग्रामीण पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या आनंद भोईटे यांचे प्राथमिक शिक्षण सणसर (ता. इंदापूर) येथे झाले आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, की, आमचा सणसरच्या जिल्हा परिषद शाळेतच शैक्षणिक पाया पक्का झाला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम मराठीतून आहे. इंग्रजी शिक्षण पुढे मिळतच असते. त्याचादेखील टप्प्याने विकास होतो. मातृभाषेतील शिक्षण विद्यार्थ्यांना आत्मसात करणे सोपे जाते.
ढेकळवाडी (ता. बारामती) येथील डॉ. तुषार बोरकर सध्या जळगाव जिल्ह्यात तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण भवानीनगर (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. डॉ. बोरकर यांनी सांगितले की, माझं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाले आहे. मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यास अभ्यास समजून घेणे सोपे जाते, हा माझा अनुभव आहे. अनेकदा पालकांच्या हट्टापायी विद्यार्थ्यांना त्यांचा कल न पाहता इंग्रजी शाळेत घातले जाते.
इंग्रजी माध्यमदेखील चांगले आहे. ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे. मात्र, घरातील वातावरण इंग्रजी शिक्षणासाठी अनुकूल असणे तितकेच महत्त्वाचे ठरते.
मुळच्या काटेवाडी (ता. बारामती) येथील प्रिया ढाकणे यांची नुकतीच उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण भवानीनगर (ता. इंदापूर) येथील प्राथमिक शाळेत झाले आहे. ढाकणे म्हणाल्या, जिल्हा परिषद शाळेत सर्व थरातील मुले येतात.
त्यातून येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्वविकास होतो. माझा हा व्यक्तिमत्त्वविकासाचा अनुभव मला आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये उपयुक्त ठरला. हा विकास विद्यार्थ्यांना भवितव्यासाठी उपयुक्त ठरतो. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण मिळाल्यास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास जलदगतीने होतो. ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षणाकडे कल वाढत आहे.