इर्शाळवाडी दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व अन् वैद्यकीय मदत, पुण्यातील भोई प्रतिष्ठानची साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 04:29 PM2023-07-21T16:29:28+5:302023-07-21T16:29:40+5:30
शनिवारी भोई प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यकीय पथक रवाना होत असून दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व ही घेण्यात येणार आहे.
पुणे: रायडमधील इर्शाळवाडी इथं दरड कोसळल्याने अख्खं गाव जमीनदोस्त झाले. याठिकाणी ढिगाऱ्याखाली बरेच लोक गाडले गेले. बुधवारी मध्यरात्रीपासून इर्शाळवाडीत शोधमोहिम सुरू आहे. NDRF पथके आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेतील जखमींवर नवी मुंबई इथं उपचार करण्यात येत आहेत. घटनास्थळी पोहचण्यासाठी कुठलीही सोय नसल्याने तासभर पायपीट करावी लागते. याठिकाणी जवळपास १०-१५ फूट मातीचा थर असल्याने बचाव पथकाला अडथळे येत आहेत. अशातच पुण्यातील भोई प्रतिष्ठानने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय पथक रवाना होणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मिलिंद भोई यांनी सांगितले आहे.
इर्शाळवाडी रायगड येथील दरडग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठानचे वैद्यकीय मदत पथक रवाना होत असुन यासंबंधी स्थानिक पोलीस प्रशासनाशी सुद्धा संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्या समन्वयातून हे मदत कार्य संपन्न होणार आहे. वैद्यकीय मदती सोबतच या बांधवांना भावनिक व मानसिक आधार देण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्प येथून पुढे राबविण्यात येणार आहे. या दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे भोई यांनी सांगितले. शनिवार 22 जुलैला डॉ.मिलिंद भोई यांच्या नेतृत्वात हे पथक रवाना होत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला लोकांचा प्रतिसाद
ही दुर्घटना घडल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहचले होते. सकाळपासून त्यांनी याठिकाणी आढावा घेतला. तासभर पायपीट करत स्वत: दुर्घटनास्थळी पोहचले. तिथल्या पीडित कुटुंबांची विचारपूस केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांबरोबरच मदतकार्यासाठी तैनात मनुष्यबळासाठी अन्नाची पाकिटे, चादरी-ब्लॅंकेटस, तात्पुरते निवारे, कंटेनर, पाण्याच्या बाटल्या, टॉर्च, बिस्किटे तसेच प्रथमोपचार साहित्य आदी मदत साहित्याचा ओघ सुरु झाला आहे.