पर्यवेक्षक, अंगणवाडीसेविकांच्या कौशल्य विकासासाठी ‘आकार’, बालकांना मिळणार प्रभावी शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 02:49 AM2018-04-04T02:49:56+5:302018-04-04T02:49:56+5:30
अंगणवाडीतील बालकांवर लहानपणी झालेले संस्कार हे महत्त्वाचे असतात. या वयात त्यांच्या शिक्षणाचा पाया घडवणे महत्त्वाचे असते. लहान मुले कसा विचार करतात, त्यांची नवीन गोष्टी शिकण्याच्या पद्धती अंगणवाडीसेविका, तसेच पर्यवेक्षिकांनाही समजणे आवश्यक आहे.
पुणे - अंगणवाडीतील बालकांवर लहानपणी झालेले संस्कार हे महत्त्वाचे असतात. या वयात त्यांच्या शिक्षणाचा पाया घडवणे महत्त्वाचे असते. लहान मुले कसा विचार करतात, त्यांची नवीन गोष्टी शिकण्याच्या पद्धती अंगणवाडीसेविका, तसेच पर्यवेक्षिकांनाही समजणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागातर्फे ‘आकार’ बालशिक्षणाचा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील, तसेच शहारातील पर्यवेक्षक यांना याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून याद्वारे त्यांच्यातील कोशल्य विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके यांनी दिली.
पूर्वप्राथमिक स्तरांवरील बालकांसाठी शास्त्रशुद्ध बालशिक्षण देणारा अभ्यासक्रम तयार करण्याचे राज्य शासनाने ठरवले. त्यानुसार हा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण या संस्थेकडे देण्यात आली. ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भागातील अंगणवाडीतील बालके डोळ्यासमोर ठेवून ‘आकार’ बालशिक्षण हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. बाल्यावस्थेतील बालकांची वैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या मानसिकतेचा विचार या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. त्यानंतर २०१४ च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आढाव्यानुसार या उपक्रमाला ‘आकार बालशिक्षणक्रम’ असे नाव देण्यात आले आहे, असे शेळके म्हणाल्या.
अंगणवाडीमधील मुलांना हाताळताना, तसेच त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी योग्य कौशल्याची आवश्यकता असते. लहान मुले कशा प्रकारे बोलतात, त्यांच्या आवडी-निवडी अशा विविध गोष्टी अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांना आत्मसात करणे गरजेचे असते. मात्र, याबाबतचे ज्ञान तसेच कौशल्य सेविका आणि मदतनीस, तसेच पर्यवेक्षक यांनाही नसल्यामुळे या बालकांना शिकवायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडतो. मात्र, आकार या उपक्रमाअंतर्गत शहर आणि ग्रामीण भागातील २०२ पर्यवेक्षकांना हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ६ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर हे पर्यवेक्षक जिल्ह्यातील अंगणवाडीमधील सेविकांना देणार आहे. त्यामधून बालकांचा सर्वांगीण विकास साधू शकतो, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.
अंगणवाडीतील मुलांचा सर्वांगीण विकास या उपक्रमामुळे होण्यास मदत होणार आहे. यामुळे ‘आकार’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यवेक्षक आणि अंगणवाडीसेविका यांना या उपक्रमाअंतर्गत शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. - दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला व बालकल्याण विभाग
जिल्ह्यात २०२ पर्यवेक्षक आहेत. एका पर्यवेक्षका अंतर्गत ४० अंगणवाड्या येतात. सुरुवातीला या पर्यवेक्षकांना ६ दिवसांचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेत देण्यात येणार आहे. त्यानंतर हे पर्यवेक्षक अंगणवाडीसेविकांना, तसेच मदतनिसांना प्रशि़क्षित करणार आहेत.