पुण्यात हेल्मेटसक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरूच राहणार : मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 07:28 PM2019-06-18T19:28:50+5:302019-06-18T19:47:51+5:30
पुणे शहरात सुरु असलेली हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी रद्द करण्यात आलेली बातमी चुकीची ठरली असून याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे.
पुणे : पुणे शहरात सुरु असलेली हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी रद्द करण्यात आलेली माहिती चुकीची ठरली असून याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. हेल्मेटसक्तीचा प्रभावी अंमलबजावणीला कोणतीही स्थगिती दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली आहे.
याबाबत अधिक की, गेल्या काही दिवसांपासून पुणे वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्तीच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. यात अनेकदा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चालकाला इ-चलन पाठ्वण्यासोबत चौकांमध्येही उभे राहून दंड आकाराला जात होता. त्या पार्श्वभूमीवर काही लोकप्रतिनिधींनी आता त्याला विरोध दर्शवला होता. शहराच्या हद्दीपेक्षा महामार्गावर हेल्मेटसक्तीची प्रभावी अंमलबजावणी करावी असे त्यांचे मत होते. यानुसार मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी प्रभावी करू नये असे आदेश दिल्याचे संदेश समाज माध्यमांवर फिरत होते. वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनीही असा कोणताही आदेश आल्याचे स्पष्ट केले होते.
अखेर खुद्द फडणवीस यांनी याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले की,ज्याप्रमाणे नागपूर आणि मुंबईमध्ये हेल्मेटवर कारवाई केली जात आहे, त्याचप्रमाणे पुण्यातही तंत्रज्ञानाचा वापर करून सी सी टी व्हीच्या साहाय्याने कारवाई करावी . उगाच नागरिकांना वेळ वाया घालवत त्यांना वेठीस धरू नये. नियम मोडणाऱ्या नागरिकांना दंडाचे चलन आकारून त्यांच्या ऑफिस किंवा घरी पाठवावे. त्यामुळे पुणेकरांनीही हेल्मेट घालणे सक्तीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.