संपूर्ण महाराष्ट्रात तौक्ते चक्रीवादळाची परिणामकारकता आज रात्री १२ पर्यंतच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 05:20 PM2021-05-17T17:20:39+5:302021-05-17T17:22:14+5:30
हवामानतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांचे मत
पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवर वादळाचा तडाखा बसला आहे. पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले आहे. काल दिवसभरात अनेक झाडपडी, घरांचे नुकसान, विजेच्या संदर्भातील घटना घडल्या आहेत.
"तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी जवळील शहरांना बराच धोका निर्माण झाला होता. आता हे गुजरातकडे सरकू लागले आहे. त्यामुळे आज रात्री बारा, एक पर्यंतच महाराष्ट्रातचक्रीवादळाचा परिणाम जाणवेल" असे हवामानतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.
काल सकाळपासूनच कोकण किनारपट्टीबरोबरच उर्वरित महाराष्ट्रात हवामानात बदल झाला होता. काही ठिकाणी वादळी वारे सुटले होते. तर काही भागात पाऊस सुरू झाला होता. पण आता दुपारनंतर उर्वरित राज्यात त्याचा परिणाम कमी जाणवू लागला आहे. सकाळपर्यंत संपूर्ण राज्याचे हवामान सुरळीत झाले असेल. असेही ते म्हणाले आहेत.
साबळे म्हणाले, सद्यस्थितीत वादळाची परिणामकारकता पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याठिकाणी जास्त आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टी जवळील भागात २०० ते ३०० मिलीमीटर पावसाचे प्रमाण वाढते. तर उर्वरित ठिकाणी १५ ते २० मिलिमीटर पाऊस पडतो. आता कालपासून आज दुपारपर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अशा बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासहित जोरदार पावसाची नोंद झाली. दुपारनंतर ते गुजरातकडे सरकू लागल्याने त्याची परिणामकारकता कमी होऊ लागली आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी १५ ते २० मिलिमीटर पाऊस झाला होता. रात्रीपर्यंत तोही पूर्णपणे बंद होईल.
पावसाने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता
चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी भागातील आंबा, काजू, सुपारी या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही वादळी वारे अथवा पाऊस यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.