व्हेंटिलेटरच्या कार्यक्षमतेला दिले जाते प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:22+5:302021-06-03T04:08:22+5:30
पुणे : कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये छातीत किती कफ साठला आहे अथवा किती संसर्ग झाला आहे, हे तपासले जाते. त्यानुसार ऑक्सिजन ...
पुणे : कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये छातीत किती कफ साठला आहे अथवा किती संसर्ग झाला आहे, हे तपासले जाते. त्यानुसार ऑक्सिजन लावायचा की व्हेंटिलेटर लावावा, याचा निर्णय घेतला जातो. फुफ्फुसांना संसर्ग झाल्यास आणि रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर व्हेंटिलेटर लावला जातो.
व्हेंटिलेरची ईटी ट्यूब आणि ह्यूमीडिफायर यांची कार्यक्षमता वारंवार तपासली जाते, स्वच्छता आणि ब्लॉकेज याकडे बारकाईने लक्ष दिले जाते, अशी माहिती अतिदक्षता विभाग तज्ज्ञांनी दिली.
दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असताना गंभीर रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली होती. व्हेंटिलेटरअभावी बऱ्याच रुग्णांना प्राणही गमवावे लागले. व्हेंटिलेटरचा तुटवडा हा आरोग्य यंत्रणेसमोरील महत्त्वाचा प्रश्न आहे. कोरोना झाल्यावर श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या आणि स्थिती नाजूक असलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये प्राधान्य दिले जाते. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरच्या यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशिक्षित आणि अनुभवी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते, याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले. तसेच, रुग्ण व्हेंटिलेटरवर गेला की तो बचावण्याची शक्यता कमी असते, हा समजही दूर व्हायला हवा, असे अतिदक्षता विभागतज्ज्ञ डॉ. अनिकेत जोग यांनी सांगितले.
-----
एकूण रुग्ण - 470311
उपचारानंतर बरे झालेले - 456509
सध्या उपचार घेत असलेले - 5518
व्हेंटिलेटर लावावे लागलेले रुग्ण - 534 (२८ मे रोजीच्या अहवालानुसार)
----------
व्हेंटिलेटरवरील रुग्ण :
(२८ मे रोजीच्या जिल्ह्याच्या अहवालानुसार)
व्हेंटिलेटरवरील रुग्ण टक्केवारी
पुणे 534 6.3
पिंपरी चिंचवड 390 9.9
ग्रामीण 361 2
-----
एकूण 1293 4.2
-------
ह्युमिडिफायरची स्वच्छता दिवसातून एकदा केली जाते. ईटी ट्यूबची दररोज स्वच्छता करावी लागत नाही. ट्यूब ब्लॉक तर होत नाही ना, याकडे लक्ष ठेवले जाते. ती ब्लॉक झाल्यास लगेच बदलली जाते. त्यातील सकशनिंग कार्य महत्त्वाचे असते.
- डॉ. रोहिदास बोरसे, अतिदक्षता विभाग प्रमुख, ससून सर्वोपचार रुग्णालय
-----
व्हेंटिलेटरची ईटी ट्यूब किंवा ह्युमीडिफायर ब्लॉक होत नाही ना, याकडे लक्ष ठेवले जाते. ह्युमीडिफायरमागचे पाणी दररोज बदलले जाते. रुग्णाच्या स्थितीवर ईटी ट्यूबचे कार्य अवलंबून असते. अतिदक्षता विभागात सर्वच प्रकारच्या यंत्रणेची डोळ्यात तेल घालून तपासणी, स्वच्छता, दुरुस्ती केली जाते.
- डॉ. सुभाल दीक्षित, माजी अध्यक्ष, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन