समाजातील कौटुंबिक व्यवस्था टिकवण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:10 AM2021-03-08T04:10:50+5:302021-03-08T04:10:50+5:30
घोडेगाव: कौटुंबिक कलहाने ग्रासलेल्या, वंचित व पीडित महिलांना न्याय मिळून देण्यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या महिला दक्षता समिती मार्फत ...
घोडेगाव: कौटुंबिक कलहाने ग्रासलेल्या, वंचित व पीडित महिलांना न्याय मिळून देण्यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या महिला दक्षता समिती मार्फत वर्षभर काम सुरू असते. प्रामुख्याने समाजातील कौटुंबिक व्यवस्था टिकावी हे या समितीचा उद्देश आहे. केवळ महिलांसाठीच नव्हे तर पत्नीच्या त्रासाला कंटालेल्या पुरुषांनादेखील महिला दक्षता समितीचा आधार वाटत आहे.
घोडेगाव पोलीस ठाण्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला दक्षात समितीच्या अध्यक्षा रत्ना गाडे असून त्यामध्ये वत्सला काळे, स्वप्ना काळे, अॅड.गायत्री काळे, डॉ.माणिक पोखरकर, अर्चना गुळवे, राजश्री सैद, सिंधुताई शिंगाडे, आशा काळे, वैजयंती गव्हाणे, वर्षा काळे या महिला एकत्र येवून काम पहातात. पोलीस ठाण्यात येणारे अर्ज, तक्रारी, महिलांच्या समस्या यावर सतत काम सुरू असते. नुसतेच महिलांच्या तक्रारींचा नाही तर पुरूषांच्या तक्रारी अर्जावर देखिल समिती काम करते. एखादी महिला घरातील पतीला त्रास देत असेल तर समिती पुरुषांच्या बाजूने उभी राहून महिलांना समज देण्याचे काम करते.
आत्तापर्यंत समितीमार्फत अनेक कौटुंबिक वाद मिटवून एकत्र कुटुंब ठेवण्याचे काम केले आहे. तसेच ज्या महिला पोलीस स्टेशनला जायला घाबरतात त्यांना हिंमत देण्याचे काम तसेच काही कौटुंबिक वाद पोलीस स्टेशनलाही न जाता बाहेरच्या बाहेरच मिटवण्याचे काम महिला दक्षता समितीने केले आहे. आत्तापर्यंत समितीने अनेक तंटे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याअगोदरच बाहेर सामोपचाराने मिटवले आहेत.
समाजातील कौटुंबिक व्यवस्था टिकवण्यासाठी आम्ही महिला दक्षता समिती मधिल सर्व महिला काम करतो. तसेच कायदेविषयक मार्गदर्शन, नवनवीन येणारे कायदे महिलांना समजावेत तसेच महाविद्यालयीन मुलींना सायबर लॉ, रॅगिंगच्या कायद्यांची माहिती व्हावी यासाठी शिबिरे घेत असल्याचे अॅड. गायत्री काळे यांनी सांगितले.
घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या महिलांविषयक गुन्हे, कौटुंबिक वादाच्या तक्रारी, समुपदेशनाची आवश्यकता असलेल्या महिलांना समुपदेशन करण्यासाठी समिती काम करते. तसेच प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला महिला दक्षता समितीची बैठक घेतली जाते. या बैठकीत महिना भरात झालेल्या कामाचा आढावा व नवीन उपक्रमांबाबत चर्चा केली जात असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.
आश्रयगृह सुरू करण्याचा मानस
महिला दक्षता समितीमार्फत भविष्यात ज्या महिलांना कोणताही सहारा नाही अशा महिलांसाठी आश्रयगृह सुरू करण्याचा मानस आमचा असून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत यासाठी देखील महिला दक्षता समिती काम करणार असल्याचे अध्यक्षा रत्ना गाडे यांनी सांगितले.
०७ घोडेगाव
घोडेगाव पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या महिला दक्षता समितीच्या महिला व सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार.