पुण्यात पर्यावरणस्नेही मेट्रो शहरी जीवन आनंददायी करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 05:40 AM2018-06-06T05:40:54+5:302018-06-06T05:40:54+5:30
परदेशी जीवनशैलीचे कौतुक नाही; मात्र तिथे जीवन आनंददायी करण्याचा प्रयत्न असतो. आता भारतातही शहरांमधील जीवन आनंददायी होणार आहे. मेट्रो हा त्याचाच एक भाग आहे.
पुणे : परदेशी जीवनशैलीचे कौतुक नाही; मात्र तिथे जीवन आनंददायी करण्याचा प्रयत्न असतो. आता भारतातही शहरांमधील जीवन आनंददायी होणार आहे. मेट्रो हा त्याचाच एक भाग आहे. ही मेट्रो १०० टक्के पर्यावरणस्नेही करण्याचा महामेट्रो कंपनीचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महामेट्रो कंपनीच्या वतीने औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. दीक्षित यांच्यासह या वेळी आमदार विजय काळे, वनस्पतीतज्ज्ञ आनंद कर्वे, आयटीआयचे प्रमुख राजेंद्र घुमे, मुख्याध्यापक प्रकाश सायगावकर आदी उपस्थित होते. या वेळी कर्वे, प्रा. परचुरे, विलास कुलकर्णी, प्रज्ञा ठाकूर, सुधीर जठार, आनंद चोरडिया, रमेश राव आदींचा पर्यावरणविषयक परिसंवाद झाला. त्यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने महामेट्रो कंपनीला काही सूचना केल्या.
दीक्षित म्हणाले, ‘‘मेट्रोचा संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक असणार आहे. वृक्षांची लागवड हा त्यातला एक भाग आहे. आतापर्यंत तीन हजार वृक्ष लावण्यात आले आहेत, तर मेट्रो मार्गात येणाऱ्या १९५ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. मेट्रोची सर्व स्थानके सौर ऊर्जाभारीत असतील. त्यातून १७ मेगावॉट विजेचा पुरवठा होईल. मागणीच्या ६५ टक्के वीज यातून उपलब्ध होणार आहे. याच स्थानकांवर पर्जन्यजलसंचय यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यातून काही हजार लिटर पाण्याचे पुनर्भरण होणार आहे. मेट्रोमध्ये वापरण्यात येणाºया सर्व पाण्याचे रिसायकलिंग करण्यात येणार आहे.
नागपूर येथील मेट्रोच्या कामात हे सर्व उपाय वापरण्यात आले. त्यामुळे नागपूरच्या स्थानकांना प्लॅटिनम दर्जा मिळाला. त्यापेक्षा पुढचे काम पुणे मेट्रोमध्ये करण्यात येणार आहे. नदीपात्रातून जाणाºया मेट्रो मार्गाचे खांब तयार करताना पर्यावरण तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येत आहे.’’