मुलांना चांगलं मनोरंजन मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचे, अभिनेते मोहन जोशींचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 15:44 IST2024-12-22T15:44:32+5:302024-12-22T15:44:45+5:30

नव्या शालेय शिक्षण धोरणात नाटक हा विषय अभ्यास म्हणून शिकवला जावा, नाट्यशिक्षण ऐच्छिक असावे

Efforts should be made to ensure that children get good entertainment, says actor Mohan Joshi | मुलांना चांगलं मनोरंजन मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचे, अभिनेते मोहन जोशींचे मत

मुलांना चांगलं मनोरंजन मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचे, अभिनेते मोहन जोशींचे मत

पुणे: टीव्ही, मोबाइलमुळे बालनाट्य बघायला गर्दी होत नाही, हा विचार खरा नाही. चांगलं बालनाट्य असेल तर ते चालतं, चालणारच. रत्नाकर मतकरी यांचे अलबत्या-गलबत्या नाटक आजही का चालतं? चांगल्या नाटकांना प्रेक्षक आहे, मुलांना सकस आहार, अन्न मिळावं म्हणून आपण जसे दक्ष असतो, तसेच मुलांना चांगलं मनोरंजन मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बालरंगभूमीचे संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांनी केले. बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित पहिल्या बालरंगभूमी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होते.

या सोहळ्याला व्यासपीठावर उद्घाटक डॉ. मोहन आगाशे, संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, सुबोध भावे, सुशांत शेलार, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, ज्येष्ठ निर्माता अजित भुरे, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के-सामंत, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के-सामंत यांनी गेल्या वर्षभरात बालरंगभूमी परिषदेतर्फे झालेले महोत्सव व कार्यक्रमांचा आढावा घेतला.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले म्हणाले की, जर प्रशिक्षणातून तानसेन निर्माण होत असतील तर कानसेनही निर्माण व्हायला हवेत; कारण प्रेक्षक असतील तर रंगमंचावर काम करण्यास मजा येते. बालवयातच हे कलेचे बालकडू मिळाल्यास निश्चितच बालरंगभूमी परिषदेच्या कार्यातून उद्याची रंगभूमी अधिक समृद्ध होईल.

उद्घाटक डॉ. मोहन आगाशे यांनी बालप्रेक्षकांशी गप्पा मारत आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, तुमच्याप्रमाणेच मी लहानपण अनुभवतो आहे. आपल्या लहानपणाची सगळ्यांत मोठी देणगी आहे, ती म्हणजे भांडण करून ते विसरायची. भांडण विसरायला पाहिजे; पण त्यासाठी आधी ते करावं लागतं. प्रत्यक्षात भांडण केलं तर रट्टा मिळतो; पण नाटकात केलं तर कौतुक होतं. त्यामुळे ही निरागसता जपा. लहानपणीच उत्तम नाटक बघण्याची सवय लागली तर उद्याचा उत्तम प्रेक्षक घडेल.

संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘माझी अभिनयाची सुरुवातही बालरंगभूमीवरूनच झाली आहे. १९६८ मध्ये जयंत तारी यांच्या ‘टुणटुणनगरी, खणखण राजा’ या बालनाट्यातून केली आहे. ६० वर्षांनंतरही बालनाट्य रंगभूमी बदलली आहे. ती हौशी नाही तर व्यावसायिक व स्पर्धात्मक झाली आहे. नव्या शालेय शिक्षण धोरणात नाटक हा विषय अभ्यास म्हणून शिकवला जावा. नाट्यशिक्षण ऐच्छिक असावे. विद्यार्थ्यांनी नट बनविण्याचा प्रयत्न करावा. बालनाट्य मुलांना भावेल असे हवं.

Web Title: Efforts should be made to ensure that children get good entertainment, says actor Mohan Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.