शाळेत ईद साजरी; सर्वधर्मसमभाव अन् सहिष्णुतेची 'ती' परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न; हुजूरपागेचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 04:10 PM2024-10-02T16:10:55+5:302024-10-02T16:11:54+5:30

सण साजरे होताना कोणत्याही धर्माचे शिक्षण, प्रसार किंवा भलावण केली जात नसून त्याग, प्रेम समता, बंधुभाव, आत्मविश्वास ही मूल्ये विद्यार्थिनींच्या मनामध्ये रुजविली जातात

Eid celebrations at school; Efforts to carry forward 'that' tradition of pantheism and tolerance; Hujurpage's explanation | शाळेत ईद साजरी; सर्वधर्मसमभाव अन् सहिष्णुतेची 'ती' परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न; हुजूरपागेचे स्पष्टीकरण

शाळेत ईद साजरी; सर्वधर्मसमभाव अन् सहिष्णुतेची 'ती' परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न; हुजूरपागेचे स्पष्टीकरण

पुणे : महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजूरपागा प्राथमिक शाळेला १८८५ पासून सुरुवात झाली. शाळेच्या शिक्षिका वेणुताई पानसे यांनी १९३४ मध्ये संपादन केलेल्या संस्थेच्या ‘प्रगतिपथावर’ या पुस्तकात स्थापनेपासून संस्था प्रागतिक विचारांची आणि समन्वयशील असल्याचे दाखले सापडतात. शाळेत पूर्वीपासूनच भिन्न-भिन्न जातीच्या व धर्माच्या मुली होत्या. प्रत्येक धर्माविषयी मुलींना थोडीथोडी माहिती असावी. यासाठी निरनिराळ्या जातीच्या सणांच्या दिवशी त्यांच्या धर्माबद्दल चौकशी करून माहिती दिली जात होती. त्या काळी शाळेच्या वसतिगृहात ब्राह्मण, ज्यू, ख्रिश्चन, मुसलमान अशा मिळून जवळपास १०० मुली होत्या. ही सर्वधर्म समभाव आणि सहिष्णुतेची परंपरा आजही संस्था पुढे नेत असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

हुजूरपागा शाळेत ‘ईद ए मिलाद’ साजरी करण्यात आल्याने सर्वत्र गदारोळ सुरू आहे. वेगवेगळे सण, उत्सव उपक्रम साजरे होताना कोणत्याही धर्माचे शिक्षण, प्रसार किंवा भलावण केली जात नाही, तर त्याग, प्रेम समता, बंधुभाव, आत्मविश्वास ही मूल्ये विद्यार्थिनींच्या मनामध्ये रुजविली जातात. हा मूल्यशिक्षणाचा भाग असतो. त्यामुळे समाजमाध्यमावरील गदारोळ अनाठायी आणि संस्थेची बदनामी करण्याच्या उद्देशाने हेतूपुरस्सर निर्माण केला गेला असल्याचे संस्थेच्या सचिव रेखा पळशीकर यांनी स्पष्ट केले. संस्थेने ‘लोकमत’शी बोलताना आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष शालिनी पाटील, सहसचिव विलास पाटील आणि विश्वस्त उषा वाघ उपस्थित होत्या.

संस्थेवर अनेक बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. उदा ; बांगड्या, मेंदी, कुंकू, आदी गोष्टींना शाळेत परवानगी नाही, संस्कृत श्लोक म्हणण्यासह सरस्वती पूजनाला बंदी आहे, असे पसरवले गेले आहे, पण यात कोणतेही तथ्य नाही, असे सांगून पळशीकर म्हणाल्या की प्रत्यक्षात मुलींच्या हातावर मेंदी काढली जाते. शाळामध्ये इयत्ता सातवी / आठवीपासून संस्कृत शिकविले जाते. श्रावणी शुक्रवारचे पालकांसाठीचे हळादीकुंकू, भोंडला, दिवाळी तसेच दिव्याची अमावस्याही साजरी होते. गीतापाठांतर, अथर्वशीर्ष पठण अशा स्पर्धाही घेतल्या जातात. संस्थेतील कोणतेही उपक्रम भारताच्या संविधानाच्या तत्त्वांशी विसंगत नाहीत. उलट ती तत्त्वे विद्यार्थिनींमध्ये रुजावीत यासाठीच संस्था कटिबद्ध आहे. दि. २८ सप्टेंबर रोजी संस्थेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेमध्येही नियामक मंडळाने आपली हीच भूमिका सभासदांसमोर मांडली. सभेने संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करीत नियामक मंडळाला पाठिंबा देणारा एकमताने ठराव मंजूर केला असल्याचेही पळशीकर यांनी सांगितले.

मान्यता रद्द केली असती, तर प्रशासक नेमला नसता का?

हिंदू महासंघाने संस्थेवर असे आरोप केले आहेत की, हुजूरपागा संस्थेच्या आताच्या संचालक मंडळाची धर्मादाय आयुक्तांनी मान्यता काढून घेतल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. तसेच मुख्य लक्ष्मी रस्ता पार्किंगच्या जागेत ८०० फूट उंचीचे दुकान बांधून ते ३००० रुपये भाड्याने दिल्याचा व्यवहार संशयास्पद आहे. धर्मादाय आयुक्तांनी संचालक मंडळाची मान्यता रद्द केल्याचा काही कागदोपत्री पुरावा आहे का? मान्यता रद्द केली असती तर आम्हाला शाळेत येण्याची परवानगी दिली असती का? प्रशासक नेमला नसता का? असे सवाल संस्थेने उपस्थित केले आहेत. संस्थेच्या सचिव रेखा पळशीकर म्हणाल्या, ३ मे १९९७ मध्ये बांधकाम समितीची सभा झाली होती. तेव्हा दीपक मेहता समितीचे सचिव होते. सभेच्या अहवालानुसार बाजीराव रस्ता इमारतीमधील एका दुकानाच्या शेजारील जागा दोडेजा नावाचा व्यक्तीला वापरायला दिली असून, या जागेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार बांधकाम समितीच्या सचिवाला ९७ च्या सभेत देण्यात आले होते. ही जागा दोडेजा यांना २ हजार रुपये भाड्याने १ मे १९९७ पासून देण्यात आली आहे. त्यावेळी सध्याचे संचालक मंडळ अस्तित्वात नव्हते. त्यामुळे हे आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतचे पुरावे संस्थेकडून ‘लोकमत’ला देण्यात आले आहेत.

हुजूरपागा शाळेला पाठिंबा देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

सर्वधर्मसमभावाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याबरोबरच मुलांमध्ये मानवतेची भावना जागृत करण्यासाठी उपक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीला पाठिंबा दर्शविण्यासाठी लोकशाही उत्सव समितीने पुढाकार घेऊन स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला अनेक पुरोगामी संघटनांसह शाळेच्या माजी विद्यार्थिनींनी समर्थन दर्शवित मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शाळा या विद्यार्थ्यांमध्ये संविधान व लोकशाहीची मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न करीत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. त्यामुळे शाळेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली असल्याची माहिती लोकशाही उत्सव समितीचे मिलिंद चव्हाण यांनी दिली.

Web Title: Eid celebrations at school; Efforts to carry forward 'that' tradition of pantheism and tolerance; Hujurpage's explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.