पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत 'ईद मिलन' कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 07:56 PM2022-05-10T19:56:03+5:302022-05-10T19:59:28+5:30
सद्यस्थितीत असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वधर्मीय बांधवांनी आपली एकात्मता जपत सामाजिक समता, बंधुता अबाधित राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी
पुणे : सद्यस्थितीत असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वधर्मीय बांधवांनी आपली एकात्मता जपत सामाजिक समता, बंधुता अबाधित राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. देशातील बदलत्या सामाजिक परिस्थितीला निव्वळ या देशातील काही मूठभर समाज विघातक प्रवृत्ती कारणीभूत असून या सर्व गोष्टींना विरोध करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी घेण्यात येणारा "ईद मिलन" कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यात होणार आहे. अशी माहिती पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे.
यावर्षी कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात येणार असून त्यामध्ये सर्व धर्मियांचे धर्मगुरू, सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श ठेवत गेल्या ६० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत शरद पवार यांनी नेहमी सर्वधर्मीय अठरा पगड जातींच्या सर्व घटकांना सोबत घेत महाराष्ट्राचा विकास केला. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून पुणे शहरात हिंदू मुस्लिम बांधवांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असूनही सर्वधर्मीय गुण्या गोविंदाने राहतात. याचे कारण येथील सलोखा जपण्यासाठी घेतले जाणारे सर्वधर्मीय कार्यक्रम पवार देखील दरवर्षी पुणे शहरात 'ईद मिलन' सारखा कार्यक्रम राबवतात. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे बंद असणारा हा कार्यक्रम यावर्षी राज्य कोविड निर्बंधमुक्त झाल्याने मोठ्या उत्साहात घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सर्व नागरिकांसाठी शिरखूर्मा व स्नेहभोजन व्यवस्था करण्यात आली असून त्यानंतर होणाऱ्या मुशायरा व कवी संमेलन या कार्यक्रमासाठी सम्पत सरल, अल्ताफ़ ज़िया, कुनाल दानिश, अनवर कमाल बेहरीन, डॉ आरिफ़ा शबनम, राना तबस्सुम, मन्नान फ़राज़ आदी नामवंत कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
हा कार्यक्रम गुरूवार दि.१२ मे २०२२ रोजी कोंढवा खुर्द येथील एन.आय.बी.एम रोडवरील,लोणकर गार्डन येथे सायंकाळी ६.०० वाजता संपन्न होणार असून सर्व धर्मीय पुणेकरांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.