फेसबुकवरची ओळख पडली साडेआठ लाखांना! पुण्यातील फसवणुकीची घटना
By भाग्यश्री गिलडा | Published: November 30, 2023 06:30 PM2023-11-30T18:30:58+5:302023-11-30T18:31:20+5:30
याप्रकरणी सुस परिसरात राहणाऱ्या एकाने बुधवारी (दि. २९) फिर्याद दिली...
पुणे : फेसबुकवरून ओळख करून कर्ज काढून देतो असे सांगून ८ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार ४ ऑक्टोबर २०२१ ते १३ जुलै २०२३ यादरम्यान घडला आहे. याप्रकरणी सुस परिसरात राहणाऱ्या एकाने बुधवारी (दि. २९) फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, तक्रारदार हे चालक म्हणून काम करतात. आरोपी स्वप्नील मनोहर पानसे (रा. धायरी) याने फेसबुकवरून कर्ज मंजूर करून देण्यासंदर्भात वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या. तक्रारदार यांनी कर्ज मंजूर करून घेण्यासाठी पानसे याला संपर्क केला. त्यावेळी आपण लांबचे नातेवाईक आहोत असे सांगून तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला.
सुरुवातील २० हजार रुपये देण्यास सांगून त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगत एकूण ८ लाख ४६ हजार रुपये उकळले. मात्र कोणताही परतावा मिळाला नाही म्हणून विचारणा केली असता "दिलेले पैसे सट्ट्यात हारलो आहे." असे सांगितले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कपिल भालेराव करत आहेत.