कुरकुंभ येथील आठवडेबाजारही भरावा ‘सातच्या आत’
By admin | Published: January 21, 2016 01:11 AM2016-01-21T01:11:57+5:302016-01-21T01:11:57+5:30
येथील गुरुवारी भरत असलेला आठवडेबाजार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायंकाळी सात वाजेपर्यंतच चालविण्याबाबत सर्व व्यावसायिकांना नोटीस देण्यात येणार
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील गुरुवारी भरत असलेला आठवडेबाजार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायंकाळी सात वाजेपर्यंतच चालविण्याबाबत सर्व व्यावसायिकांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सरपंच जयश्री भागवत यांनी सांगितले.
येथील औद्योगिक क्षेत्रामधील वाढती लोकसंख्या, परिसरातील बदलत्या नागरीकरणामुळे अल्पावधीत या आठवडेबाजाराची उलाढाल लाखोच्या घरात जाऊन पोहोचली. परिणामी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक या ठिकाणी आवर्जून येत राहतात, मात्र रात्री नऊ वाजण्याच्या सुमारासदेखील हा बाजार चालूच राहत असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
बहुसंख्येने औद्योगिक क्षेत्रामधील तसेच परिसरातील ग्रामीण भागातील महिला, कामगार, व्यावसायिक या ठिकाणी येतात. बऱ्याच वेळा मोबाइल चोरी, पाकीट चोरी, व्यावसायिकांना लुटणे, मालाची चोरी होण्याच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत.
या बाजारासाठी साधारणत: दुपारपासून गर्दी सुरू होते, मात्र याबाबत सकाळपासूनची वेळ निश्चित करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, उशिरापर्यंत महिला तसेच व्यावसायिक यांच्याबाबतीत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, तसेच भविष्यात सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही समस्या निर्माण होऊ न देण्याच्या दृष्टिकोन ठेवण्यात येणार आहे.वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.