महिला पोलीस अंमलदारांना आठ तास ड्यूटी, आजपासून प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:22 AM2021-09-02T04:22:29+5:302021-09-02T04:22:29+5:30
सदरचा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील २९ पोलीस स्टेशन व त्या अंर्तगत पोलीस चौकीत कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई नाईक, ...
सदरचा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील २९ पोलीस स्टेशन व त्या अंर्तगत पोलीस चौकीत कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई नाईक, हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक यांना त्याचा लाभ मिळणार आहे. पोलीस महासंचालक यांनी पोलीस दलातील महिला अंमलदार यांच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना आठ तास काम करण्याबाबत मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या
त्यानुसार जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी करावी, असे सांगितले होते. याची दखल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी तसे आदेश काढले आहेत.
सदर महिला कर्मचारी यानां दिवस-रात्र मिळून १२ तास काम करावे लागते. अनेकदा सण, उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे, आंदोलन, मोर्चे यानिमित्ताने अधिक वेळ काम करावे लागते. अशा प्रसंगी महिलांना शासकीय कामासह कौटुंबिक जबाबदारी अशी दुहेरी भूमिका पार पाडताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कर्तव्य आणि जबाबदारी संभाळताना तारेवरची मोठी कसरत करावी लागते. त्याचा विचार करून पोलीस महासंचालकांनी महिला पोलीस कर्मचारी यांना आठ तास कामाच्या मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलीस दलात आजपासून अंमलबजावणी होणार आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलात आजपासून अंमलबजावणी
महिला पोलीस अंमलदारांना यापुढे आठ तास ड्यूटी करावी, असा आदेश पोलीस महासंचालकांनी काढला असून त्याची अंमलबजावणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी आजपासून केली आहे. यामुळे या निर्णयाचा महिला पोलीस कर्मचारी यांनी स्वागत करून आनंद व्यक्त केलेला आहे.