दापोडी येथे बिबट्याचा धुमाकूळ, आठ जणांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 01:56 AM2018-11-06T01:56:30+5:302018-11-06T01:56:50+5:30
दापोडी (ता. दौंड) येथे रविवारी मध्यरात्री टुलेवस्ती व इंगळेवस्तीत रात्रीच्या सुमारास घराबाहेर झोपलेल्या ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला करीत ८ जणांना गंभीर जखमी केले.
केडगाव - दापोडी (ता. दौंड) येथे रविवारी मध्यरात्री टुलेवस्ती व इंगळेवस्तीत रात्रीच्या सुमारास घराबाहेर झोपलेल्या ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला करीत ८ जणांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून, या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
या हल्ल्यामध्ये कैलास अनंता पवार (वय ३५), शकील जमीन शेख (वय ६५), बबलुकुमार विक्रमसिंग (वय ३८), रणजित सुशील गोपाल (वय ८), अश्रुबा रंगनाथ चव्हाण (वय ६०), अप्पा बाबा सातपुते (वय ६६), दादा गायकवाड (वय ४०), संतोष (वय ४०, पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. टुलेवस्ती व इंगळेवस्ती) यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ५ परप्रांतीय मजुरांचा समावेश आहे. हे मजूर गुºहाळघरावर कामाला होते. यातील कैलास पवार हे गंभीर जखमी असून, त्यांच्या डोक्याला बिबट्याने चावा घेतला आहे. पवार यांना ३५ टाके पडले आहेत. तसेच दादा गायकवाड यांच्या बोटाचा बिबट्याने लचका तोडला असून बोट तुटले आहे. या घटनेनंतर वनविभागाने सुरुवातीस बिबट्याऐवजी पिसाळलेले कुत्रे असेल असे सांगितले. सोमवारी एका वीटभट्टीवरील ओल्या विटेवर बिबट्याच्या पायाचा ठसा आढळल्याने वनविभागाची धावाधाव झाली. सायंकाळी ६ च्या सुमारास या परिसरात पिंजरा लावण्यात आला. २ गंभीर जखमींना पुणे येथे खासगी रुग्णालयात तर इतरांना केडगाव परिसरातील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पारगाव (ता. दौंड) येथील गोलांडेवस्ती येथे २ महिन्यांपूर्वी एक बिबट्या वनविभागाने जेरबंद केला होता. त्यानंतर ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.