भाडेकरूंची माहिती न दिल्याने आठ जणांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 01:09 AM2019-03-23T01:09:36+5:302019-03-23T01:09:49+5:30
घरमालकांनी भाडेकरूंची माहिती न दिल्याने आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
नीरा - पुरंदर तालुक्यातील नीरा व परिसरातील घरमालकांनी भाडेकरूंची माहिती न दिल्याने आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
नीरा व परिसरात परप्रांतीय लोक वास्तव्यास असणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाच्या पथकाने नीरा व परिसरात वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय लोकांची माहिती घेऊन हे लोक ज्या घरमालकांच्या खोलीत भाड्याने राहात आहेत, त्या घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना दिली का नाही हे तपासत होते. त्यावेळी नीरा व परिसरात आठ परप्रांतीय घरमालकांच्या खोलीत राहात असतानादेखील त्यांची माहिती नीरा पोलीस दूरक्षेत्रात दिली नसल्याचे आढळले. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाच्या पथकाने आठ घरमालकांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक संदीप कारंडे करीत आहेत.
वास्तविक, घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे जरूरीचे आहे. दरम्यान, नीरा व परिसरात ज्या घरमालकांच्या खोलीत परप्रांतीय राहत असतील त्या घरमालकांनी अद्यापपर्यंत पोलिसांना माहिती दिली नाही त्यांनी तातडीने नीरा पोलिस दूरक्षेत्रात माहिती द्यावी, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने केली आहे.