कौतुकास्पद! पुणे पोलिसांच्या पुढाकाराने लॉकडाऊनमध्ये अडकलेले साडेअठरा हजार परप्रातिंय स्वगृही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 07:21 PM2020-05-18T19:21:57+5:302020-05-18T19:23:23+5:30
पुणे शहरात अडकून पडलेले परप्रांतीय श्रमिक, विद्यार्थी आणि नागरिक यांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया 9 मे पासून सुरू आहे.
पुणे : लॉकडाऊनमुळे शहरातच राहावे लागलेल्या तब्बल 18 हजार 537 परप्रांतीय बांधवांना पुणे पोलिसांच्या पुढाकाराने स्वगृही पाठविण्यात आले. कोरोनामुळे निर्माण झालेलया आपत्कालीन परिस्थितीत जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये पुणे शहरात अडकून पडलेले परप्रांतीय श्रमिक, विद्यार्थी आणि नागरिक यांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया 9 मे पासून सुरू आहे. नुकतेच प्रयागराज-उत्तरप्रदेश या रेल्वेमधून 1 हजार 520 जणांना रवाना करण्यात आले. त्यात परिमंडळ 3 मधील पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या नागरिकांचा समावेश आहे.
पुणे रेल्वे स्टेशन ते बोतिया बिहार अशा दुस-या रेल्वेची व्यवस्था करून अशा 1 हजार 452 नागरिकांना रवाना करण्यात आले. त्यामध्ये परिमंडळ, 2, 3, 4, 5 येथील नागरिकांचा समावेश होता. तिसरी रेल्वे ही पुणे स्टेशन ते मारवाड-पाली-जयपूर अशी राजस्थान येथे 1 हजार 93 नागरिकांना घेऊन रवाना झाली. आत्तापर्यंत 18 हजार 537 नागरिकांना विविध राज्यात रवाना करण्यात आले आहे. रेल्वेने प्रवास करणार्या नागरिकांना पोलिस ठाण्याच्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून त्यांना पीएमपीएल बसमध्ये एका सीटवर एक व्यक्ती अशा पध्दतीने बसवून पुणे स्टेशन येथे आणूना त्या ठिकाणी सोशल पोलिसिंग सेलच्या वतीने सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅनिटायझर, मास्क, साबण देण्यात आले. खाण्याच्या व्यवस्थेबरोबर त्यांची पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली. यावेळी आयपीएस ऑफिसर्स वाईज ऑरगनायझेशन यांच्या वतीने श्रमिक यांची लहान मुले, वयोवृध्द यांच्या साठी दुध पॅकेट, गुळ वाटण्यात आला. पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त तथा नोडल अधिकारी सारंग आव्हाड, पुणे शहर परिमंडळ 1 ते 5 चे पोलिस उपायुक्त, विभागातील सहाय्यक पोलिस आयुक्त व संबंधित पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी आपल्या कर्मचार्यांच्या मदतीने ही सुविधा पुरवली.