साडेअठरा टीएमसी पाणीवापर गृहीत धरूनच होणार नियोजन ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 01:54 PM2019-12-28T13:54:33+5:302019-12-28T14:02:21+5:30
उन्हाळ्यातील बाष्पीभवन ग्राह्य धरल्यास किमान साडेपाच टीएमसी पाणी उपलब्ध
पुणे : कालवा सल्लागार समितीच्या शनिवारी (दि. २८) होणाऱ्या बैठकीत पुणे शहराचा वार्षिक पाणीवापर १८.५० अब्ज घनफूट (टीएमसी) गृहित धरुनच पाण्याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे साडेसहा टीएमसी सिंचनासाठी पाणी यंदा उपलब्ध होऊ शकेल. शहराबरोबरच पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील पाण्याचे नियोजनही या बैठकीत केले जाणार आहे.
दरवर्षी १५ ऑक्टोबरअखेरीस धरणात शिल्लक असणाऱ्या पाणीसाठ्याच्या आधारे नियोजन केले जाते. कालवा सल्लागार समितीला आकस्मिक बिगरसिंचन आरक्षण, वापरातील फेरबदल आणि वार्षिक कोटा मंजुरीचे अधिकार नाहीत. त्यांना केवळ सिंचनासाठी शिल्लक राहणाºया पाण्याचे नियोजन करता येते. त्या पार्श्वभूमीवर शहराच्या सध्याचा १४०० ते १४५० दशलक्ष लिटर (एमएलडी) दररोजचा पाणीवापर गृहीत धरून जलसंपदातील अधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे. हा पाणीवापर वार्षिक १८ ते १८.५० टीएमसी गृहीत धरला आहे. सध्या खडकवासला धरणसाखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणात मिळून २४.९३ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातून साडेअठरा टीएमसी पाणी वजा केल्यास ६.४३ टीएमसी पाणी शिल्लक राहते. उन्हाळ्यातील बाष्पीभवन ग्राह्य धरल्यास किमान साडेपाच टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकेल.
..........
नीरा डाव्या कालव्याबाबतही बैठक
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून, त्यास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपलब्ध असतील. सकाळी दहा वाजता बैठक सुरू होईल. सुरुवातीस निरा डावा आणि उजवा कालवा, त्यानंतर चासकमान, भामा-आसखेड आणि पवना धरणाबाबत बैठक होईल.
खडकवासलाची बैठक दुपारी साडेबाराच्या सुमारास होणार आहे. त्यानंतर दुपारी अडीच ते चार या वेळेत उजनी धरणातील पाणी नियोजनावर बैठक घेतली जाणार असल्याची माहिती जलसंपदातील अधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीत रब्बी आणि उन्हाळी आवर्तनाबाबत चर्चा होईल. त्यातही रब्बी आवर्तनातील नियोजनावर प्राधान्याने चर्चा होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.