ससून रुग्णालयात लैंगिक अत्याचार पीडितांसाठी एक खिडकी योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 08:52 PM2020-02-05T20:52:05+5:302020-02-05T20:55:25+5:30
बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार व अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना साहाय्य
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात लैंगिक अत्याचार पीडितांच्या मदतीसाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे. योजनेमध्ये बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार व अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना वैद्यकीय सल्ला, समुपदेशन, अर्थसाहाय्य व कायदेशीर सल्ला आणि पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना कार्यान्वित करणार आहे. ससूनतर्फे एका छत्राखाली स्त्रीरोगशास्त्र, बालरोगशास्त्र, बालरोगशल्य चिकित्साशास्त्र, मनोविकारशास्त्र, प्लास्टिक सर्जरी व न्यायवैद्यकशास्त्र या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला दिला जाईल. पुणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणतर्फे मोफत कायदेशीर सल्ला दिला जाणार आहे. यासाठी अॅड. लक्ष्मी वाघमारे, अॅड. उज्ज्वला थोरात आणि अॅड. श्रुती डुंबरे या विधिज्ञांची नेमणूक केलेली आहे.
एक खिडकी योजनेचे उदघाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे साहेब यांच्या हस्ते केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते. चंदनवाले म्हणाले, ‘लैंगिक अत्याचार पीडित व्यक्ती साहाय्य घेण्यासाठी पुढे येतील व त्यांना न्याय मिळणे सुलभ होईल. अत्याचार पीडित व्यक्तींचा वेळ वाचेल. वैद्यकीय उपचार, समुपदेशन व कायदेशीर सल्ला ससून सर्वोपचार रुग्णालयातच मिळाल्यामुळे पीडित व्यक्तीच्या पुनर्वसनात मोलाचा हातभार लागेल.’ या कार्यक्रमाला उपाधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. रमेश भोसले, डॉ. वंदना दुबे, डॉ. आरती किणीकर, डॉ. नितीन अभिवंत, डॉ. अजय तावरे, डॉ. विजय जाधव, डॉ,मीनाक्षी भोसले व डॉ. सोमनाथ सलगर उपस्थित होते.