'एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते त्याग करणारे नेते आहेत' - चंद्रशेखर बावनकुळे
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 8, 2025 18:45 IST2025-02-08T18:42:10+5:302025-02-08T18:45:53+5:30
महापालिका निवडणुका एप्रिलमध्ये होतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

'एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते त्याग करणारे नेते आहेत' - चंद्रशेखर बावनकुळे
- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वाेच्च न्यायालयात राज्य शासनाचा युक्तिवाद सुरू आहे. ओबीसी आरक्षणावर लवकरच निर्णय होईल. त्यानुसार न्यायालय निवडणूक घेण्यास मान्यता देईल. फेब्रुवारीत निकाल आला. तर, एप्रिल महिन्यात निवडणुका होऊ शकतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (दि.०८) केला. पिंपरी-चिंचवड शहरात लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या जयंती निमित्त टेनिस बॉल क्रिकेट आमदार चषक स्पर्धेचे उद्घाटन महसूलमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बावनकुळे म्हणाले, ‘आता खूप दिवस महापालिका नगरसेवकाविना राहू नयेत. लवकरच या निवडणुका होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकर निकाल देण्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाला विनंती केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करताच महाराष्ट्र शासन मनुष्यबळ, व्यवस्था उपलब्ध करून देईल. त्यामुळे निवडणुकीसाठी सज्ज रहावे. काहीही करून पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी सदस्य नोंदणी वाढवावी.
महायुती म्हणूनच निवडणूक लढविणार...
बावनकुळे म्हणाले, महापालिकेची निवडणूक स्थानिक आहे. त्यामुळे स्थानिक समितीला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्र म्हणून महायुतीने सोबत लढले पाहिजे, असा निर्णय आहे. पक्ष आणि मंत्र्यांमध्ये समन्वय रहावा, खात्याचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवेत. यासाठी भाजपच्या मंत्र्यांकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे.
राहुल गांधी यांनी कामठीतून विधानसभेची निवडणूक लढवावी...
बावनकुळे म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माझ्या कामठी विधानसभा मतदारसंघावर गडबड झाल्याचा आक्षेप घेतला आहे. त्यांनी या मतदारसंघाचा अभ्यास केला पाहिजे. येथे सलग २५ वर्षापासून भाजप जिंकत आहे. गांधी यांनी २०२९ ची निवडणूक कामठी विधानसभेतून लढवी असे माझे आव्हान आहे. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असून चितपट केल्याशिवाय राहणार नाही.
एकनाथ शिंदे नाराज नाहीत...
एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते त्याग करणारे नेते आहेत. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही. मी आणि माझा मुलगा यात ठाकरे फसले. त्यामुळे वाटोळे झाले. महायुती सरकार व्यवस्थित सुरू आहे. एकनाथ शिंदे चार खात्याचे मंत्री असून चांगले काम करत आहेत. महायुती मजबूत आहे. पुढची २५ वर्षे महाराष्ट्रात महायुती सरकार चालवेल. असेही बावनकुळे म्हणाले.