मुख्यमंत्र्यांची साखरपेरणी! शरद पवार यांची केली तोंडभरून स्तुती; म्हणाले, फोन करून मार्गदर्शनही करतात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 07:09 AM2023-01-22T07:09:00+5:302023-01-22T07:09:44+5:30
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही नेते शनिवारी एकाच मंचावर प्रथमच एकत्र आले.
पुणे :
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही नेते शनिवारी एकाच मंचावर प्रथमच एकत्र आले. पवार यांनी राज्य सरकारचा नामोल्लेख टाळला. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी पवार यांच्यावर स्तुतिसुमनांची चौफेर उधळण करीत, आवश्यकता असल्यास पवार फोन करून मार्गदर्शन करतात, असा गौप्यस्फोटही केला. त्यामुळे कार्यक्रमानंतर या साखरपेरणीचीच चर्चा जास्त रंगली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मुख्यमंत्री शिंदे व शरद पवार उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात पवार यांनी साखर उद्योगाचा, संस्थेच्या कारभाराचा आढावा घेतला. त्यांनी करतात. मुख्यमंत्री मंचावर असतानाही राज्य सरकारकडून कोणतीही अपेक्षा व्यक्त केली नाही. त्यानंतर भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र पवार यांची भरभरून स्तुती केली. 'असेच मार्गदर्शन करत राहा, असे सांगायलाही ते विसरले नाहीत...
आवश्यकता असेल तेव्हा फोन करतात !
पवार साहेब अनुभवी नेते आहेत. अनेक वर्षे या राज्यात आणि देशामध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. कुठला माणूस सत्तेवर बसला आहे, हे न पाहता राज्याच्या हितासाठी आणि सर्वसामान्य लोकांना मदत होण्यासाठी ते नेहमी मार्गदर्शन करतात. मलादेखील ते आवश्यकता असेल तेव्हा फोन करतात, सूचनाही करतात, मार्गदर्शनही
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
हायड्रोजन इंधन पर्याय ठरेल
केंद्र सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे भविष्यातील पर्यायी इंधन ठरणार आहे. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून, त्यांचा वापर हायड्रोजनच्या उत्पादनासाठी केला जाऊ शकतो.
-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी
त्यांच्या अनुभवाचा लाभ
सहकार क्षेत्रात ज्यांचा शब्द अंतिम मानला जातो, असे ज्येष्ठ पवार साहेब आपल्यासोबत आहेत. ते केंद्रीय कृषिमंत्री होते त्यावेळेस अनेक मुख्यमंत्री, कृषिमंत्री त्यांचे मार्गदर्शन घेत होते. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा आपण सहकार आणि कृषी क्षेत्रांमध्ये करून घ्यायला हवा. मी पवार साहेबांना विनंती करतो की, असेच वेळोवेळी मार्गदर्शन करत राहा, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
शिंदे - अजित पवार चर्चा
शरद पवार यांचे भाषण सुरु असतानाच मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात व्यासपीठावर बराच वेळ सुरु असलेल्या चर्चेने सगळ्यांचेच लक्ष वेधले. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय खलबते झाली? याबद्दल तर्क लढवले जात आहेत.
१४ फेब्रुवारीला सरकार कोसळणार : पटोले
१४ फेब्रुवारीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट शिंदे फडणवीस सरकार बेकायदेशीर असण्यावर शिक्कामोर्तब करील व सरकार कोसळेल, असे भाकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.