"संघर्ष संपवून सगळे एक व्हावे हीच शिवसैनिकांची इच्छा..."; युवा सेना पदाधिकाऱ्याच्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 07:27 PM2022-07-04T19:27:25+5:302022-07-04T21:25:36+5:30
'भविष्यात हा संघर्ष नक्की मिटेल असा विश्वास...'
-राजू इनामदार
पुणे: शिवसेनेत निर्माण झालेला संघर्ष मिटावा हीच आमची इच्छा आहे. आम्ही माजी मंत्री उदय सामंत समर्थक असलो तरीही सामंत यांचीही तीच इच्छा होती, त्यामुळे आमचेही तेच म्हणणे आहे असे शिवसेनेच्या युवा सेनेचे महाराष्ट्र सहसंघटक किरण साळी यांनी सांगितले. भविष्यात हा संघर्ष नक्की मिटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माजी शिक्षणमंत्री व बंडखोरीनंतरही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहून राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीलाही उपस्थित राहिलेले उदय सामंत यांचे साळी कट्टर समर्थक आहेत. आता शिंदे गटाला मान्यता मिळाली, शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्यानंतर साळी म्हणाले, आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. सामंत यांचेही तेच म्हणणे आहे. बाहेर रस्त्यावर सर्व शिवसेना एकत्रच आहे, विधीमंडळात फूट पडली असेल, मात्र भविष्यात तीही भरून निघावी, सगळेच एक व्हावेत अशीच शिवसैनिक म्हणून आपली इच्छा आहे असे साळी यांनी सांगितले.
जे पारंपरिक शत्रू होते ते मागील अडीच वर्षात मित्र झाले, जे मित्र होते ते शत्रू होण्यापर्यंत वेळ आली. त्यामुळेच संघर्ष करायचा तर कोणाबरोबर करायचा असा प्रश्न आता शिवसैनिकांना पडला आहे. हा संभ्रम दूर करण्याचे काम नेत्यांचे आहे. ते त्यांनी करावे, कोणातरी ज्येष्ठ शिवसैनिकाला मध्ये घालून हा संघर्ष मिटवणे गरजेचे आहे असे आपले मत असल्याचे साळी म्हणाले.
दरम्यान बंडखोरीच्या सुरूवातीच्या काळात एकाही शिवसैनिकाचे बंडाला समर्थन मिळाले नाही असे पुणे जिल्ह्यात आता बंडखोर गटाला मान्यता मिळाल्यावर व शिंदे यांच्याकडे थेट मुख्यमंत्रीपद आल्यावर मात्र त्यांच्या समर्थक पुढे येऊ लागले आहेत. माजी मंत्री, पुरंदर तालुक्यातील विजय शिवतारे यांनी उद्धव ठाकरे यांचे काय चुकले याची जाहीरपणे वाच्यता केली, तर शिरूर चे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अभिनंदनाचे फलक लावले. त्यावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही झाली व ती लगेचच मागेही घेतली गेली.
अशा गोष्टींनीही शिवसैनिकांमध्ये आता संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. त्यावरून जिल्ह्यातही आता शिवसेनेचे दोन गट तयार होण्याची शक्यता दिसते आहे. अद्याप थेट मोठे कोणी सामोर आलेले नाही, मात्र आढळराव व शिवतारे यांच्या जाहीर भूमिकेनंतर यात फरक पडण्याची चिन्हे आहेत.