Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 01:43 PM2023-03-29T13:43:01+5:302023-03-29T13:43:39+5:30
त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे, महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते Pune MP Girish Bapat passed away, former kasba mla girish bapat, pune lok sabha mp
मुंबई /पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती.
सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात.