Eknath Shinde: येळकोट येळकोट जय मल्हार, मुख्यमंत्र्यांनी घेतले कुलदैवताचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 06:57 PM2022-08-02T18:57:06+5:302022-08-02T18:58:53+5:30
जेजुरी गड विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे/जेजुरी - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी, जेजुरी गडाच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे आज पुण्यात दौऱ्यावर असून त्यांनी सकाळीच लोकप्रतिनिधी आणि विभागीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी प्रशसनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर, त्यांनी सासवड येथील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. रात्री पुणे येथे पार्कचे उद्घाटन केल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार आहे.
सासवड येथील शेतकरी मेळावा उरकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सायंकाळी साडेपाच वाजता जेजुरीत आगमन झाले. येथील मुख्य चौकात कडेपठार मंदिराला बसवण्यात येणाऱ्या काळसाची पूजा केली. त्यानंतर, त्यांनी सहा वाजता जेजुरी गडावर जाऊन कुलदैवताचे दर्शन घेतले. त्यांचे सोबत खा. श्रीरंग बारणे, माजी खा. शिवाजी आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते. देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त तुषार सहाणे, सॉलिसिटर प्रसाद शिंदे, अड् अशोक संकपाळ, राजकुमार लोढा, शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे यांनी त्यांचे स्वागत केले. देवदर्शन उरकून मुख्यमंत्री पुण्याकडे रवाना झाले.