PMC Division: एकनाथ शिंदेंची राजकीय खेळी; पुणे महापालिकेचे विभाजन, फुरसुंगी - उरुळीसाठी नवीन नगरपालिका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 11:31 AM2022-12-07T11:31:18+5:302022-12-07T11:31:33+5:30
गावांमध्ये अद्याप पायाभूत सुविधा दिलेल्या नसताना मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करण्यात येत असल्याबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी होत्या.
पुणे : पुणे महापालिकेमध्ये २०१७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन्ही गावे महापालिकेमधून वगळण्यात येणार आहेत. या दोन्ही गावांची एकत्रित नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. येत्या दोन आठवड्यांत यासंदर्भातील आदेश काढण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे होती. या दोन गावांसह ११ गावांच्या विकास आराखड्याचे काम पालिकेकडून सुरू असून, अंतिम टप्प्यात आले आहे, तसेच पालिकेच्या वतीने या गावांमध्ये तीन टीपी स्कीमदेखील राबविण्यात येत आहे. गावांमध्ये अद्याप पायाभूत सुविधा दिलेल्या नसताना मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करण्यात येत असल्याबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे महापालिका सुविधा देत नसल्याने ही दोन गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी केली.
होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला माजी मंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, मिळकत कर विभागाचे प्रमुख अजित देशमुख उपस्थित होते.
पालिकेचे क्षेत्रफळ कमी होणार पुणे महापालिकेमध्ये ११ गावे आणि त्यानंतर पालिकेत २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे महापालिका भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महापालिका ठरली होती; पण आता ही दोन गावे वगळण्यात येणार आहेत. या दोन्ही गावांची लोकसंख्या अडीच लाख आहे. त्यामुळे पालिकेचे क्षेत्रफळ कमी होणार आहे.
नागरिकांना दिलासा
फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नागरिकांकडून पालिका मोठ्या प्रमाणात कर आकारणी करीत होती. पालिका नागरिकांकडून अक्षरश: जिझिया कर वसूल करीत होती. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. आता नगरपालिका झाल्यामुळे नागरिकांना मिळकत कर कमी होणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीला फटका
हडपसर महापालिका करावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, ही मागणी मागे पडली आहेत. आता ही गावे वगळल्यामुळे राष्ट्रवादीला फटका बसणार आहे. पालिकेच्या प्रभागरचनेत या गावांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढली असती. त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला असता.
नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी
नगरपालिकेच्या माध्यमातून उरुळी देवाची, फुरसुगी गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. पुणे महापालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरु केलेल्या प्रकल्प, योजनामध्ये सहकार्य देणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कचरा प्रकल्प या दोन गावांतच
पुणे महापालिकेचे उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांत अनेक कचरा प्रक्रिया प्रकल्प आहेत. आता या दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपालिका होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, पालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या कचरा व्यवस्थापन, तसेच अन्य नागरी प्रकल्पांमध्येही सहकार्य केले जाईल, असे या गावातील नागरिकांनी सांगितले.