एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाने पुण्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांत चलबिचल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 12:27 PM2022-07-02T12:27:17+5:302022-07-02T12:32:15+5:30
जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्येही एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्रीच झाल्याने चलबिचल...!
पुणे : महाविकास आघाडीची सत्ता घालवून भारतीय जनता पक्ष सत्तेत आला तरीही भाजपच्या शहर जिल्हा कार्यालयात ना ढोल वाजला, ना पेढे वाटले गेले. त्याचबरोबर शिवसेनेत फूट पडल्यावर उद्धव ठाकरेंना पाठिंबा व बंडखोरांचा निषेध करणाऱ्या शहरातील व जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्येही एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्रीच झाल्याने चलबिचल सुरू झाली आहे.
मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस येणार म्हणून भाजपचे शहरातील कार्यकर्ते जल्लोषाच्या तयारीत होते. मात्र फडणवीस यांनी ती पत्रकार परिषद घेतली, आपण सरकारमध्ये नसू तर बाहेर असू, हे जाहीर केले व कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी पडले. त्यात पुन्हा मुख्यमंत्रिपद बंडखोरांचे नेते शिंदे यांच्याकडे व उपमुख्यमंत्रिपद फडणवीसांकडे यामुळे तर जल्लोषही थांबला. कार्यालयात सुरू झाली ती फक्त चर्चाच. आता काहीच होणार नाही हे पक्के झाल्यावर तर ती चर्चाही बंद झाली व कार्यकर्ते आपापल्या घरी निघून गेले.
फडणवीस तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजपच्या जुन्या नेत्यांचे वर्चस्व मोडीत काढत संपूर्ण शहर व जिल्ह्यावरही चांगली पकड तयार केली आहे. शहरातील या दोघांच्याही समर्थकांची संख्या प्रचंड आहे. त्यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापासून माधुरी मिसाळ, आमदार मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर अशा अनेकांचा समावेश आहे. त्या सर्वांच्याच उत्साहावर आता पाणी पडले आहे. नक्की करायचे तरी काय अशा विवंचनेत ही सगळी मंडळी आहेत. त्यातही आमदारांची आता मंत्रिपद मिळते की काय, त्यासाठी काय करता येईल याची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
दुसरीकडे शिवसेनेतील बंडखोरांचे पुण्यात कोणीही समर्थक नसल्याने त्यांच्याविरोधात पुण्यात बराच जोर होता. माजी खासदार शिवाजीराव आढळराव तसेच माजी मंत्री विजय शिवतारे वगैरे उद्धव ठाकरेंबाबत थोडी नाराजी व्यक्त करीत होते, मात्र सामान्य शिवसैनिक बंडखोरांचा निषेधच करीत होते. त्यातील काही जणांनी तर भूम परांडातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे धनकवडीतील कार्यालयच फोडले. मात्र आता भाजपने शिंदे यांना थेट मुख्यमंत्रिपद दिले आहे. त्यामुळे या शिवसैनिकांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे. त्यांच्यातील काहींनी तर निषेधाच्या बातम्यांमधून आपली नावे वगळावीत, अशी विनंतीच पत्रकारांना केली.
कोण होणार मंत्री?
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असले तरी सरकारमध्ये भाजपच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यात पुन्हा प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील पुण्यातीलच आमदार आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात मंत्रिपदे नक्की येणार याची सर्वांनाच खात्री आहे. दरम्यान, पाटील यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला मंत्री करणार याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.