'एकपात्री'मध्ये लागतो अभिनयाचा अधिक कस : स्वरूपकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:07 AM2021-06-05T04:07:56+5:302021-06-05T04:07:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नाटकात जेवढ्या भूमिका तेवढे कलाकार असतात. त्याला ठराविक संहिता असते. रंगमंचावर मुक्त वावर करता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नाटकात जेवढ्या भूमिका तेवढे कलाकार असतात. त्याला ठराविक संहिता असते. रंगमंचावर मुक्त वावर करता येतो. एकपात्री नाट्यामध्ये मात्र अनेक भूमिका एकाच कलाकाराला साकाराव्या लागतात. आपल्या अभिनयातून विविध भूमिका वठवत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते. त्यामुळे एकपात्री कला सादर करताना अभिनयाचा अधिक कस लागतो. त्यातून कलाकार समृद्ध होत जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक स्वरूपकुमार यांनी केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
ज्येष्ठ एकपात्री कलाकार मधुकर टिल्लू यांचा २१ वा स्मृतिदिन व हास्यषष्ट्यब्दीपूर्ती वर्षानिमित्त एकपात्री कलाप्रसार दिनाचे औचित्य साधून एकपात्री कलाकार परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या एकपात्री कला महोत्सवाचे उद्घाटन स्वरूपकुमार यांच्या हस्ते झाले.
महिनाभर चालणाऱ्या या कला महोत्सवात ५० पेक्षा अधिक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. स्वरूपकुमार यांच्या 'श्री व सौ भंपकजी आडमुठे' यांच्या एकपात्री प्रयोगाने या महोत्सवाची सुरुवात झाली. वयाच्या ८७ व्या वर्षीही त्याच बखुबीने स्वरूपकुमार यांनी सादर केलेल्या या नाट्याने प्रेक्षकांना भरभरून हसवले.
कथाकार द. मा. मिरासदार कथाकथन स्पर्धेच्या विजेत्यांची नावे यावेळी घोषित करण्यात आली. सुरेंद्र गुजराथी यांना प्रथम, अनुपमा कुलकर्णी यांना द्वितीय तर मेधा पाटील, पल्लवी परब आणि राहुल भालेराव यांना विभागून तृतीय पारितोषिक जाहीर झाले. प्रसंगी एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्ष दीपक रेगे, उपाध्यक्षा चैताली माजगावकर-भंडारी, सचिव नरेंद्र लवाटे यांच्यासह दिलीप हल्ल्याळ, मकरंद टिल्लू आदी उपस्थित होते.
मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. दीपक रेगे यांनी प्रास्ताविक केले. दिलीप हल्ल्याळ यांनी आभार मानले.
-------------------------
महिनाभर होणार महोत्सव
एकपात्री कलाकारांना नवीन दालन निर्माण करणाऱ्या मधुकर टिल्लू यांना मानवंदना म्हणून या कला महोत्सवाचे आयोजन केले आहे. विविध कलाकार एकपात्री, कथाकथन, काव्य यांवर आधारित एकपात्री, द्विपात्री, अभिवाचन, नाट्यप्रवेश असे बहुविध कार्यक्रम सादर करतील. एकपात्री कलाकार परिषदेच्या फेसबुक पेजवरून रोज सायंकाळी ५ वाजता हा महोत्सव विनामूल्य पाहता येणार आहे.
-------------------------------------------------------