‘एकता दौड हा समाजासाठी संदेश’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:54 PM2018-08-30T23:54:20+5:302018-08-30T23:54:53+5:30
इंदापूर तालुक्यातील सामाजिक एकता, बंधुता व समतेसाठी आयोजित ‘एकता दौड’ मुळे समाजात सर्वधर्म निर्माण होण्यास मदत होणार आहे. समाजासाठी हा एकतेचा संदेश आहे,
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सामाजिक एकता, बंधुता व समतेसाठी आयोजित ‘एकता दौड’ मुळे समाजात सर्वधर्म निर्माण होण्यास मदत होणार आहे. समाजासाठी हा एकतेचा संदेश आहे, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. बुधवार ( दि. २९ ) रोजी सकाळी ८.३० वाजता, इंदापूर महाविद्यालयाच्या प्रांगणातील कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आंतरराष्ट्रीय धावपट्टू ललिता बाबर, बारामती आयर्नमॅन विजेते सतीश ननवरे, पुणे आयर्नमॅन विजेते दशरथ जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘एकता दौड’ची सुरुवात करण्यात आली.
एकता दौडची सुरवात इंदापूर महाविद्यालयाच्या मैदानावरून करण्यात आली. पुढे पुणे-सोलापूर महामार्ग - पंचायत समिती - शंभर फुटी रोड - स्मशानभूमी मार्गे - रामवेस नाका - जुनी तहसिल कचेरी - नेहरू चौक - मुख्य बाजारपेठ ते पुन्हा इंदापूर महाविद्यालयाच्या मैदानावर समारोप करण्यात आला. तालुक्यातील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, श्री नारायणदास रामदास कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालय, एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय व तालुक्यातील विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, अनेक महाविद्यालये, प्राथमिक शाळा या एकता दौड मध्ये सहभागी झाले
होते. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शखाली वाहतूक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. आय कॉलेज च्या राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी काम पाहिले. यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा, श्री नारायणदास रामदास ट्रस्टचे अध्यक्ष मुकुंद शहा, रिपब्लिकन पार्टी युथ फोर्सचे अध्यक्ष संजय सोनवणे, भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख माऊली वाघमोडे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे तज्ज्ञ संचालक मंगेश पाटील, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्राचार्य डॉ. प्रवीण नेमाडे, प्रा. भरत भुजबळ, व सामाजिक कार्यकर्तेे पदाधिकारी उपस्थित होते.
इंदापूर तालुक्यातील मुलींनी ललित बाबर हिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, देशासाठी पदके मिळवावीत. संपूर्ण राज्याचे सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. त्या धर्तीवर इंदापूर तालुक्यातील वातावरण अस्थिर होऊ नये, म्हणूनच एकता दौडीचे आयोजन केले आहे. यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित पाहून मनस्वी आनंद होत आहे.’’
- हर्षवर्धन पाटील, माजी सहकारमंत्री
मैदानी खेळांमध्ये यशस्वी ठरण्यासाठी ग्रामीण भाग हा मुला - मुलींना वरदान ठरत आहे. याचाच फायदा घेत इंदापूर तालुक्यातील खेळांडूनी मेहनत घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे. यासाठी पालकांनी मुलांना खेळण्याचे स्वातंत्र्य द्यावे व शिक्षणाची संधी निर्माण करून द्यावे. मी स्वत: सुवर्णपदक मिळविण्यासाठी दहा वर्षे घरा बाहेर राहून कष्ट केले आहेत.’’
- ललिता बाबर