थोरल्या भावाने धाकट्याला धू-धू धुतले; 'कारण' ऐकून पोलिसांनी डोक्यालाच हात लावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 04:02 PM2020-09-24T16:02:32+5:302020-09-24T16:03:19+5:30
दोघे भाऊ पुण्यातील शिवणेमध्येच पण वेगवेगळे राहत आहेत.
पुणे : कुटुंबात भांड्याला भाडे लागणारच असे म्हटले जाते.पण अनेकदा ही भांडी इतक्या जोरात एकमेकाला लागतात आणि त्यासाठी कारणही तितकेच क्षुल्लक असते.त्यातून भांडणे थेट पोलिसांपर्यंत जातात. असाच प्रकार शिवणेमध्ये बुधवारी दुपारी झाला. कारण ऐकून कोणालाही हसु आवरल्याशिवाय राहणार नाही.
धाकट्या भावाने न विचारता आपल्या पत्नीला माहेरवरुन घेऊन आल्याचा राग अनावर झाल्याने थोरल्या भावाने पकडीने तर भावजयीने स्टीलचा खलबता मारुन जखमी तसेच त्याच्या पत्नीलाही मारहाण केली.
याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी थोरल्या भावाला अटक केली आहे.
याप्रकरणी शिवणे येथे राहणाऱ्या ३३ वर्षाच्या धाकट्या भावाने उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, दोघे भाऊ शिवणेमध्येच पण वेगवेगळे राहत आहेत. धाकट्या भावाची पत्नी माहेरी गेली होती. थोरल्या भावाला न विचारता धाकटा आपल्या पत्नीला माहेरवरुन घेऊन आला. आपल्याला न विचारता त्याने त्याच्या पत्नीला माहेरवरुन घेऊन आल्याचे थोरल्याला समजले. तेव्हा रागाच्या भरात तो आपल्या पत्नीला घेऊन धाकट्या भावाच्या घरी बुधवारी दुपारी साडेचार वाजता आला. त्याने धाकट्याला मला न विचारता तू तुझ्या बायकोला माहेरुन का घेऊन आला, असा जाब विचारला. त्यावरुन दोघा भावांमध्ये भांडणे झाली. तेव्हा थोरल्या भावाने धाकट्याला लोखंडी पकडीने मारुन जखमी केले. त्याच्या पत्नीने आपल्या धाकट्या जावेच्या डोक्यात स्टीलचा खलबत्ता मारुन जखमी केले. धाकटा भाऊ व त्याच्या पत्नीवर उपचार करण्यात आले असून पोलिसांनी थोरला भाऊ व त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. थोरल्या भावाला अटक केली असून हवालदार भोंडेकर अधिक तपास करत आहेत.