Pune Crime: जुन्या जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

By विवेक भुसे | Published: January 5, 2024 01:19 PM2024-01-05T13:19:31+5:302024-01-05T13:20:14+5:30

गंभीर जखमी झालेला भावाला जवळपास १५ हून अधिक तास उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाला.....

Elder brother killed younger brother due to old land dispute Pune Crime news | Pune Crime: जुन्या जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

Pune Crime: जुन्या जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

पुणे : शिवणे येथे राहणारा लहान भाऊ सूस गावात राहणार्‍या मोठ्या भावाकडे गावाकडील जमिनीचा सात बारा मागण्यासाठी कुर्‍हाड घेऊन गेला. मोठ्या भावाने लाकडी बांबुने मारहाण केली. दुपारी घडलेल्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या लहान भावाला मोठ्या भावाने रिक्षा घालून रात्री वारजे येथे आणले व रस्त्याच्या कडेला बसवून तो निघून गेला. गंभीर जखमी झालेला भावाला जवळपास १५ हून अधिक तास उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाला.

लक्ष्मण गोबरिया रामावंत (वय ३५) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत संतोष विश्वावत ऊर्फ पवार (वय १९, रा. शिवणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रिमराम गोबरिया रामावत (रा. सूस गाव) याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची आई, बहिण गंगा रामावत, दाजी लक्ष्मण रामावत त्यांच्या मुलांसह शिवणे येथे राहतात. मिळेल तेथे मजुरी काम करतात. लक्ष्मण रामावत यांचा मोठा भाऊ सूसगावातील पाटीलनगर येथे राहतात. ते मुळचे तेलंगणा येथील धनवाडा तालुक्यातील हनुमान तांडा येथील राहणारे आहेत़ त्यांच्या गावाकडील जमिनीवरुन दोघा भावांमध्ये वाद आहेत. मागील ९ दिवसांपूर्वी दोघांमध्ये वारजे येथील मजूर अड्ड्यावर जोरात भांडणे झाली होती. त्यावेळी दोघांनी एकमेकांना मारहाण केली होती. त्यांची बहिण गंगा रामावत या रेशन कार्डासाठी गावाकडे गेल्या होत्या.

फिर्यादी हे ३ जानेवारी रोजी सकाळी मजुरीसाठी जात असताना त्यांच्या चुलत बहिणीचा फोन आला. त्यात लक्ष्मण रामावत हे वारजे येथील सर्व्हिस रोडला बेशुद्धावस्थेत पडले असल्याचे सांगितले. फिर्यादी हे तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना माई मंगेशकर रुग्णालयात घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

त्यानंतर फिर्यादी यांनी याची माहिती नातेवाईकांना दिली. तसेच ते लक्ष्मण यांचा मोठा भाऊ रिमराम याला जाऊन भेटले व लक्ष्मणचा मृत्यु झाल्याचे सांगितले. तेव्हा रिमराम म्हणाले की, २ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता लक्ष्मण जमिनीचा सातबारा मागण्यसाठी हातात कुर्‍हाड घेऊन सूसगावातील घरी आला होता. त्याने दारु पिली होती. जमिनीचा सातबारा नाही दिला तर कुर्‍हाडीने मारुन टाकीन, अशी धमकी देऊन अंगावर धावून आला. मी त्याच्या हातातील कुर्‍हाड काढून घेऊन ती घराच्या पत्र्यावर टाकली. रागाच्या भरात तेथेच पडलेल्या लाकडी बांबुने लक्ष्मण याला मारहाण केली. त्यात लक्ष्मण जखमी झाल्याने निपचित पडला. सायंकाळ झाल्यानंतर त्यास कसेतरी उठवले. रात्री ९ वाजता रिक्षामध्ये घालून वारजे येथील पुणे -बंगलुरु महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर बाजूला बसवून घरी परत आलो. मी स्वत:हून हिंजवडी पोलीस ठाण्यात हजर होणार आहे, असे सांगितले. त्यानंतर दुसºया दिवशी ३ जानेवारी रोजी लक्ष्मण हे मृतावस्थेत आढळून आले होते. मुळ घटना सूस गावात घडली असल्याने वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तो हिंजवडी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

Web Title: Elder brother killed younger brother due to old land dispute Pune Crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.