शुक्रवार पेठेत ज्येष्ठ दाम्पत्य मृतावस्थेत सापडले; पतीने उचललं टोकाचं पाऊल
By विवेक भुसे | Published: June 18, 2023 03:54 PM2023-06-18T15:54:05+5:302023-06-18T15:54:46+5:30
आजारी पत्नीचा खून करुन नंतर पतीने गळफास घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय
पुणे: शुक्रवार पेठेतील चिंचेची तालीम परिसरातील एका सदनिकेत ज्येष्ठ दाम्पत्य मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आजारी पत्नीचा खून करुन नंतर पतीने गळफास घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हेमंत रामकृष्ण थोरात (वय ६४) आणि त्यांची पत्नी सुनीता (वय ५८, दोघे रा. सेवा मित्र मंडळाजवळ, चिंचेची तालीम, शुक्रवार पेठ) अशी मृतावस्थेत सापडलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
थोरात हे बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून दोघेही अमेरिकेत आहेत. येथे दोघे पतीपत्नीच रहात होते. पत्नी सुनीता या गेल्या ३ ते ४ वर्षांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर मानसोपचार करण्यात येत होते. थोरात दाम्पत्याचा घराचा दरवाजा सकाळी बंद होता. दरवाजा उघडा नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी दरवाजा वाजविला. मात्र, थोरात यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर या घटनेची माहिती खडक पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा सुनीता काॅटवर बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळून आले. हेमंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
सुनीता आणि हेमंत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सुनीता यांच्या मृत्युमागचे कारण समजू शकले नाही. खडक पोलिसांकडून थोरात यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात येत आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच सुनीता यांच्या मृत्युचे कारण पुढे येण्याची शक्यता आहे. पुण्यात त्यांचे भाचे, पुतणे व इतर नातेवाईक आहेत. त्यांना याची माहिती देण्यात आली असून त्यांनी थोरात यांच्या मुलांना त्यांनी या घटनेची माहिती दिल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगिता यादव यांनी सांगितले.