वीजरोधक यंत्रणा फोल; वीज अंगावरून ज्येष्ठाचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 03:17 PM2023-04-10T15:17:07+5:302023-04-10T15:17:18+5:30
शासनाने त्यासाठी लाखो रुपये खर्च केले मात्र ही यंत्रणा बसवूनही वीज पडण्याचे प्रमाण जास्तच
राजगुरूनगर: चास ता. खेड येथे आज सायंकाळी ६ च्या सुमारास अंगावर विज कोसळून राम गंगाराम काळे (वय ७० ) यांचा मृत्यू झाला. चास व परिसराला रविवारी दि ९ रोजी सायंकाळच्या वेळेस मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसासह ढगांच्या गडगडाट व विजेच्या कडकडात संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान जोराचा पाऊस झाला. यावेळी चास येथे राहणारे राम गंगाराम काळे यांच्या अंगावर विज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
राम काळे यांचे संपूर्ण अंग भाजल्याप्रमाणे काळे पडले असून पाय तर पूर्णपणे काळे पडले होते. या बाबत खेड पोलीसात माहिती दिल्यावर काळे यांचे शरीर शवविच्छेदनासाठी राजगुरूनगर येथे नेण्यात आले. खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.
चास व परिसरात अनेक गावांमध्ये मागील वर्षी शासनाच्यावतीने लाखो रूपये खर्च करून विज रोधक ( विज अटकाव यंत्र ) यंत्रणा बसविण्यात आली आहे. शासनाने त्यासाठी लाखो रुपये खर्च केले मात्र ही यंत्रणा बसवूनही वीज पडण्याचे प्रमाण जास्त आहे यंत्रणा बसवूनही विज कोसळून जर नागरिकाचा मृत्यू होत असेल तर या यंत्रणेचा काय फायदा काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्या बाबत निश्चिच चौकशी होणे गरजेचे असल्याची ग्रामस्थ मागणी करीत आहेत.