औंधमध्ये चोरट्यांकडून ज्येष्ठाचा खून, चतु:शृंगीच्या वरिष्ठ PI ची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 10:32 AM2024-06-17T10:32:02+5:302024-06-17T10:32:37+5:30
या घटनेची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेत आरोपींविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत....
पुणे : औंध भागातील परिहार चौकातून सकाळी फिरायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेत आरोपींविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. याशिवाय चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कुलकर्णी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.
समीर राय चौधरी (७७) हे गुरुवारी (दि. १३) सकाळी साडेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडले होते. औंधमधील परिहार चौकात चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. चोरट्यांनी चौधरी यांच्या डोक्यात गज मारल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला तसेच आणखी दोघांवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या चौधरी यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली.
औंधमधील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी जय सुनील घेंगट (१९, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी एका मुलाची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपींना दारूचे व्यसन आहे. नशेसाठी त्यांनी लूटमार केल्याचे तपासात उघडकीस आले.