बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात वृद्ध महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:21 AM2021-09-02T04:21:36+5:302021-09-02T04:21:36+5:30
वडगाव व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्यांचे वास्तव्य दिसून येत असून या अगोदर या परिसरातून एक बिबट्या वनविभागाने पिंजरा ...
वडगाव व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्यांचे वास्तव्य दिसून येत असून या अगोदर या परिसरातून एक बिबट्या वनविभागाने पिंजरा लावून पकडून नेलेला आहे. तरी वडगाव ते कडूस या परिसरात बिबटे नागरिकांच्या नजरेस पडले असून परिसरातील नागरिकांवर बिबट्याने एकूण तीन जीवघेणे हल्ले केले आहेत. दि.०३-०८-२०२१ रोजी वडगाव पाटोळे येथील साबळेवस्ती येथील संदीप मारुती पाटोळे (वय ४३) हा युवक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला होता तर गायकवाड वस्तीजवळ दि.१८-०८-२०२१ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शेतकरी सुभाष निवृत्ती गायकवाड (वय ४७) यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. परंतु या बिबट्याला पकडण्यात वनविभागास अद्याप यश आले नाही. बिबट्याच्या दहशतीने वडगाव व परिसरातील शेतकरी धास्तावले असून शेतातील काम करण्यास शेतकऱ्यांना बिबट्याची भीती वाटत आहे. तसेच राजगुरुनगर शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग पहाटेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत चांडोली ते वडगाव व गायकवाडवस्ती या परिसरात फिरण्यासाठी व व्यायामासाठी गर्दी करत असतात. परंतु बिबट्याच्या भीतीने नागरिकांची संख्या घटली आहे.
चांडोली, वडगाव, गायकवाडवस्ती, तोत्रेवस्ती, साबळेवस्ती, तनपुरेवस्ती या परिसरातील नागरिकांना बिबट्याच्या भीतीने घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे परिसरात नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली असून या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावून बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी वडगाव पाटोळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रामदास पाटोळे यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आक्रमक झाले असून नागरिकांमध्ये वनविभागाविषयी नाराजी व्यक्त होत आहे.