वास्तुशांतीसाठी निघालेले ज्येष्ठ बसमध्येच बेशुद्ध; प्रसंगावधान वाहक व चालकाने गाठले हॉस्पिटल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 01:11 PM2023-05-16T13:11:09+5:302023-05-16T13:11:52+5:30

पीएमपी बस जीवदूतासारखी हॉस्पिटलपर्यंत धावून गेल्याने वाहक व चालकाचे सर्वत्र कौतुक अन् ज्येष्ठाचे वाचले प्राण

Elders leaving for Vastu Shanti are unconscious in the bus; Incidentally, the carrier and driver reached the hospital | वास्तुशांतीसाठी निघालेले ज्येष्ठ बसमध्येच बेशुद्ध; प्रसंगावधान वाहक व चालकाने गाठले हॉस्पिटल

वास्तुशांतीसाठी निघालेले ज्येष्ठ बसमध्येच बेशुद्ध; प्रसंगावधान वाहक व चालकाने गाठले हॉस्पिटल

googlenewsNext

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथे राहणाऱ्या मुलीच्या घराच्या वास्तुशांतीसाठी पत्नीसोबत निघालेले ज्येष्ठ नागरिक बसमध्येच बेशुद्ध पडले. आवाज देऊनही उठत नसल्याने पत्नी घाबरली. मात्र, पीएमपीएल वाहकाने प्रसंगावधान राखत चालकाला बस हॉस्पिटलला नेण्यास सांगितली. प्रवाशांच्या मदतीने बेशुद्ध असणाऱ्या त्या ज्येष्ठाला रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्थेतील ज्येष्ठ नागरिकास तातडीने उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचू शकले. पीएमपी बस जीवदूतासारखी हॉस्पिटलपर्यंत धावून गेल्याचा अनुभव ज्येष्ठाच्या कुटुंबीयांना आला.

पीएमपीएल बसचे चालक सहदेव पवार हे स्वारगेट ते धायरी मार्गावरील बस घेऊन गुरुवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान निघाले होते. गजानन यादव (वय ७४, रा. येरवडा, लक्ष्मीनगर) पत्नी शोभा (६५) यांच्यासमवेत धायरीला जाण्यासाठी या बसमधून प्रवास करीत होते. यादव यांची मुलगी सुनीता पवार यांच्या धायरीतील घराची वास्तुशांती शुक्रवारी होती. त्यासाठी पती-पत्नी गुरुवारी मुलीकडे चालले होते. धायरी येथील बस स्टॉपवर त्यांना उतरायचे असल्याने पत्नीने आदल्या स्टॉपवर पती गजानन यादव यांना आवाज दिला. मात्र, पतीकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. यादव यांच्या पत्नी शोभा घाबरल्या. बसमधील वाहक तानाजी कांबळे व काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखून बस जवळच्या खासगी रुग्णालयाजवळ नेऊन त्यांना उपचारासाठी दाखल केले.

तातडीने पावले उचलल्याने जीव वाचला

वाहक तानाजी कांबळे आणि प्रवासी तुषार बेलोशे (रा. धायरी, चव्हाण शाळेजवळ) यांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या गजानन यादव यांच्यावर पाणी शिंपडले. चालकाच्या डब्यात असलेला कांदा हुंगायला दिला. एकीकडे असे उपचार सुरू ठेवले, तर दुसरीकडे त्यांनी धायरीतील अनुजा हॉस्पिटलच्या दिशेने बस नेली. डॉक्टरांनी तपासले असता त्यांचा रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा निम्म्याने कमी झाला होता. ईसीजी रिपोर्ट व्यवस्थित आला नव्हता. गळे यांनी डॉक्टरांनी माईल्ड अटॅकची शक्यता वर्तवली होती. दरम्यान, वाहक कांबळे यांनी गजानन यांच्या पत्नी मार्फत त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. नातेवाइकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. चालक, वाहक आणि प्रवाशांनी वेळीच तातडीने पावले उचलल्याने गजानन यांचे प्राण वाचू शकले.

''पीएमपीचे वाहक आणि काही प्रवासी गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गजानन यादव यांना घेऊन आले होते, तेव्हा त्यांचा रक्तदाब अवघा ७० ते ८० आला. सामान्य माणसाचा रक्तदाब १३० इतका असतो. ईसीजी देखील व्यवस्थित नव्हता. एकूण स्थितीवरून माइल्ड अटॅक असल्याचे दिसत होते. नातेवाइकांना त्यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची विनंती केली. त्यानंतर आम्ही पेशंट काहीसा सामान्य पातळीवर आल्याची खात्री झाल्यावर रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. - डॉ. नम्रता बिराजदार, अनुजा हॉस्पिटल, धायरी'' 

Web Title: Elders leaving for Vastu Shanti are unconscious in the bus; Incidentally, the carrier and driver reached the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.